पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या मालकीच्या सडा येथील जागेवर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी पर्यायी जागा सुचविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मुरगाववासियांना दिले. पुढील सुनावणी २१ जुलैला ठेवली आहे.
सुनावणीवेळी याचिकेतील प्रतिवाद्यांमध्ये आमदार संकल्प आमोणकर तसेच काही मुरगावातील रहिवासी उपस्थित होते. मुरगाव बंदर प्राधिकरणे दाखल केलेल्या याचिकेत त्यांच्या मालकीच्या जमिनीवर परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तो हटवण्यास स्थानिक आमदार संकल्प आमोणकर तसेच मुरगाववासियांनी विरोध केल्याने त्यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते.
खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा हटवण्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीतील निर्णयांचा आराखडा सादर केला. ही कारवाई करण्याची तारीख व वेळ अजूनही निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, २७ जुलैपूर्वी ही कारवाई केली जाईल असे खंडपीठाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.