पणजी : पुढारी वृत्तसेवा
'स्टेट केअर' उपक्रमाद्वारे राज्यात घरपोच आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. डायलिसिस, केमोथेरपी रुग्णांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध केली जाईल. अशा प्रकारच्या घरपोच सुविधा देणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरेल. प्रत्येक तालुक्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र उभारण्याची योजना असून निवडणुकीपूर्वी राज्यात आणखी १०० रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) या केंद्रीय संस्थेने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत प्रदान केलेल्या सुमारे ६ कोटी खर्चाच्या १९ रुग्णवाहिकांचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. बांबोळी येथे आयोजित रुग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, एनटीपीसीच्या विभाग प्रमुख वंदना चतुर्वेदी, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश तिवारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, स्टेट केअर उपक्रमात घरगुती फिजिओथेरपी, उपशामक काळजी, वृद्धांसाठी साहाय्य, स्ट्रोक केअर साहाय्य, डायलिसिस व केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी वाहतूक सुविधा यांचा समावेश असेल.
राणे म्हणाले, ज्या रुग्णांना घरी नियमित वैद्यकीय साहाय्य आणि मदतीची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी विशेष आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षण सुविधांचा विस्तार करण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दक्षिण गोव्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राणे म्हणाले, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे गोव्याला अतिरिक्त ५० वैद्यकीय जागा मिळाल्या आहेत. देशाची वैद्यकीय शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीनुसार, वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांची संख्या वाढवणे हे प्रमुख प्राधान्यक्रम आहेत.
पणजी : कारापूर येथे होत असलेला प्रकल्प कायदेशीर आहे. त्या प्रकल्पाविरोधात जे लोक आंदोलन करत आहेत, त्यांना विरोधक प्रोत्साहन देत आहेत. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याची प्रतिक्रिया नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
ते म्हणाले, विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, अशी प्रतिक्रिया देताना आपण यावर जास्त बोलू इच्छित नसल्याचे राणे म्हणाले. मी टीव्ही पाहत नसल्यामुळे मला काहीच माहीत नाही. तुम्ही माझ्या तोंडून काही काढून घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर मी काहीही बोलणार नाही. मला काहीच माहीत नाही, असे म्हणत राणे यांनी जास्त भाष्य करणे टाळले.