गोवा

Rahul Gandhi | गोवा बनले भ्रष्टाचाराचे मॉडल; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल

Rahul Gandhi | राहुल गांधी : गरिबांच्या जमिनी अरबपतींना विकून कमावला पैसा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
देशात सर्वाधिक भ्रष्टाचार गोव्यात होत असून, भाजप सरकारने गोव्याला भ्रष्टाचाराचे मॉडल बनवले आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि लोकसभा मतदारसंघातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मडगाव येथे केला. गोवा राखून यात्रेच्या समारोपानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, गोवा हे देशातील सर्वात सुंदर ठिकाण आणि नंदनवन होते. येथील संस्कृतीही सर्वांगसुंदर होती. मात्र, भाजप सरकारने गरीब आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून कोट्यधीशांना विकल्या. मास्टरप्लॅन रद्द करून आपल्या मित्रांना आणि अरबपतींना गोव्याच्या जमिनी विकल्या. गोव्याला पिगी बँक बनवून पैसा कमावला.

देशात भ्रष्टाचार करू पाहणाऱ्यांना गोव्यात भ्रष्टाचाराचे तंत्र शिकायला मिळते. येथे हायटेक भ्रष्टाचार सुरू आहे. गुजरातमध्ये मतचेारीचे मॉडल बनले होते, तसे गोवा भ्रष्टाचाराचे मॉडल बनले आहे. हे चित्र गोमंतकीयांचे बदलायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपमध्ये सर्वाधिक भ्रष्ट लोक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाची मालमत्ता दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र राज्यातील तरुण बेरोजगार आहेत. संविधान आणि गोव्याचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसला पूर्ण बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

गोवा कोणाची खासगी मालमत्ता नाही

राहुल गांधी म्हणाले की, गोवा ही मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांची खासगी मालमत्ता नसून ती गोमंतकीयांची मालमत्ता आहे. संपूर्ण देश उद्योगपती अदानी आणि अंबानी चालवत आहेत. देशातील विमानतळे, पालिकेत सुविधा, रस्ते, वीज प्रकल्प आणि जमिनी त्यांच्या घशात घातल्या जात आहेत. गोव्यातही अशीच परिस्थिती आहे, असा आरोप त्यांनी केला. गोवा राखून यात्रा काढल्याबद्दल त्यांनी प्रदेश काँग्रेसचे कौतुक केले. यापुढेही लोकांना भेटा, त्यांचे प्रश्न समजून घ्या, माझी गरज भासल्यास मी केव्हाही, कुठेही येण्यास तयार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मोदी, शहा, ज्ञानेश कुमार यांना घाबरत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचेारीचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, मोदी नियोजन करतात, शहा त्याची अंमलबजावणी करतात आणि ज्ञानेश कुमार मतचेारीची प्रक्रिया राबवतात.

मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, छत्तीसगड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि आसाममध्येही मतचेारी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. मी त्यांना घाबरत नाही. माझ्यावर बदनामीच्या ४५ खटले दाखल करण्यात आले आहेत. मात्र, मतचेारीच्या आरोपांबाबत एफआयआर दाखल करणार नाही. तसे केल्यास न्यायालयात तेच अडचणीत येतील, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे, असे त्यांनी नमूद केले.

'त्यांची' एक्सपायरी डेट जवळ आली

मोदी, शहा आणि ज्ञानेश कुमार यांच्याशी दिल्लीत लढा देऊ. तुम्ही चिंता करू नका. त्याबाबत काम सुरू असून त्यांची एक्सपायरी डेट जवळ आली आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, देशातील जेन जी त्यांच्या विरोधात गेली आहे. अलीकडे तुम्ही मोदींचा चेहरा पाहिला आहे का? त्यांची ५६ इंचाची छाती आता कुठे गेली?

मोदी जेन जीसमोर उभे राहू शकत नाहीत, अशी स्थिती आहे, अशी टीका त्यांनी केली. जगाला भारताची दर्जेदार शिक्षणव्यवस्था ही ताकत असल्याचा माहीत होते; मात्र आता ती संपवण्यात आली आहे. चांगले शिक्षण, रोजगार आणि न्याय मागणाऱ्या तरुणांवर मोदी आणि शहा यांच्या सरकारकडून बॅलेट गन व लाठ्या चालवल्या जात आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT