पेडणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्यातील सर्व किल्ले समुद्रमार्गाने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. हळर्ण येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या पुनर्बाधणीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, पुरातत्त्व खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक नीलेश फळदेसाई, जि. पं. सदस्य राघोबा कांबळी, श्रीकृष्ण हरमलकर, उपसरपंच दिया नाईक, सरपंच अशोक धावसकर, बाळा शेटकर, सुबोध महाले, गौरी जोसलकर, माजी सरपंच भूषण नाईक, पंच अॅड. मयूर परब आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे राज्यातील किल्ले राज्याचा अमूल्य वारसा आहेत. देशी-विदेशी पर्यटकांना अल्पावधीत सर्व किल्ल्यांना भेट देता यावी यासाठी समुद्रमार्गाने किल्ले जोडण्याची योजना राबविली जाणार आहे. रस्तेमार्गाने प्रवासात अधिक वेळ लागत असल्याने हा प्रकल्प पर्यटनाला नवी दिशा देईल.
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून या योजनेची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा विचार असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल. हळर्ण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ६६ लाख रुपये खर्चुन पुनर्बाधणी पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात संरक्षण भिंत, आतील कक्षांचे जतन, आधुनिकीकरण तसेच इतिहास संशोधक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.
फर्मागुडी किल्ल्याचे कामही पुढील काही महिन्यांत पूर्ण होईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटक आणि अभ्यासकांना ऐतिहासिक माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राजमोहन शेट्ये, उमाकांत पोके आणि गोविंद नाईक यांचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन नीलेश नाईक यांनी मानले.