School  Pudhari
गोवा

Goa Government Primary School | गोव्यातील सरकारी शाळांसाठी धोक्याची 'घंटा'! वर्षभरात तब्बल 2 हजार विद्यार्थ्यांची घट

Goa Government Primary School | पटसंख्येत वर्षभरात दोन हजारांची घट ; खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सरकारी प्राथमिक शाळांना अत्याधुनिक इमारती, नवीन शिक्षक यांसारख्या साधनसुविधा देण्यास सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. मात्र, शाळांच्या पटसंख्येला लागलेली 'गळती' रोखण्यात अपयश येत आहे. परिणामी, गेल्या काही वर्षांपासून सरकारी शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटण्याचे सत्र सुरूच आहे.

यंदा तर एका वर्षात तब्बल २ हजार विद्यार्थ्यांची घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सरकारी प्राथमिक शाळांसाठी ही धोक्याची 'घंटा' मानली जात आहे. खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ५०,१४३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, याच कालावधीत सरकारी प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची संख्या २०२५-२६ मधील १७,०२७ वरून १५,१६३ वर आली आहे. त्यामुळे १,८६४ विद्यार्थ्यांची घट झाली आहे.

सरकारी शाळांमधील घटत्या पटसंख्येमुळे शिक्षकांची संख्याही कमी करण्यात आली आहे. परिणामी, एकाच शिक्षकाला अनेक इयत्ता आणि अनेक विषय शिकवावे लागतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे तसेच विविध विषयांचा अभ्यासक्रम अपेक्षित पद्धतीने पूर्ण करणे हे आव्हान ठरू शकते. याउलट, अनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये आवश्यकतेनुसार शिक्षक उपलब्ध असतात.

ही बाब पालकांसह विद्यार्थ्यांसाठी जमेची, तर संबंधित शाळांसाठी बलस्थान ठरत आहे.
शाळेची इमारत, शिक्षकांची उपलब्धता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि शाळेपर्यंतची सोय या बाबी पालकांच्या निर्णयावर परिणाम करणाऱ्या ठरतात. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे.

घटती पटसंख्या ही केवळ विद्यार्थ्यांच्या संख्येतील घट नसून, सरकारी प्राथमिक शिक्षण व्यवस्थेमागील महत्त्वाचा प्रश्न म्हणून पाहणे आवश्यक ठरत आहे.
सरकारी प्राथमिक शाळांच्या तुलनेत अनुदानित आणि अन्य शाळांना विद्यार्थी व पालकांकडून मिळणारी वाढती पसंती हे पटसंख्या घटण्यामागील प्रमुख कारण असल्याचे दिसून येते.

सर्व विद्यार्थ्यांना घरपोच सेवा

सद्यःस्थितीत राज्यातील जवळजवळ सर्व खासगी आणि अनुदानित शाळा तसेच हायस्कूलकडे स्वतःच्या अथवा सरकारी किंवा खासदार निधीतून उपलब्ध झालेल्या बालरथ बसेस आहेत. या बसेसद्वारे विद्यार्थ्यांना घरपोच सेवा मिळत असल्याने पाल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालकांना या शाळा सोयीस्कर आणि सुखकर वाटतात. त्यामुळे पालकांचा कल खासगी शाळांकडे वाढताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT