पणजी : पुढारी वृत्तसेवा
मांडवी नदीत डेल्टा प्लेझर क्रूझ कंपनी प्रा. लि. यांच्या एम. व्ही. डेल्टीन रॉयल या नव्या मोठ्या कॅसिनो जहाजास परवानगी देण्यासंदर्भात गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (जीसीझेडएमए) गंभीर पर्यावरणीय निरीक्षणे नोंदविण्यात आली होती.
मात्र, या सर्व निरीक्षणांकडे दुर्लक्ष करून सरकारने या जहाजाला परवानगी दिल्याची माहिती आता समोर येत आहे. आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, २३ जून २०२५ रोजी जीसीझेडएमएचे तज्ज्ञ सदस्य डॉ. सुशांत एस. नाईक, अभियंता केशव नाईक आणि क्षेत्रिय अधिकारी विघ्नेश नाईक यांनी ही तपासणी केली होती.
या तपासणीत विद्यमान एम. व्ही. फ्लॉटेल या जहाजाच्या जागी मोठ्या आकाराचे एम. व्ही. डेल्टीन रॉयल है जहाज आणण्याचा प्रस्ताव तपासण्यात आला. अहवालात जहाजाच्या पाचव्या स्तरापर्यंतची माहिती दिली असली, तरी त्यावरील ओपन डेकसह एकूण उंची स्पष्ट करण्यात आलेली नाही. याबाबत संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय प्राधिकरण घेणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असले, तरी सरकारने तत्वतः या जहाजाला मंजुरी दिल्याचे समजते. दरम्यान, अहवालात नमूद केल्याप्रमाणे, मांडवी नदीत आधीच अनेक कॅसिनो जहाजे कार्यरत आहेत.
त्यामुळे ही नदी पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून आणखी मोठ्या जहाजाची भर पडल्यास एकत्रित पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निरीक्षणात सर्वांत महत्वाची बाब म्हणजे प्रस्तावित ठिकाणी आवश्यक मूलभूत पर्यावरणीय माहिती उपलब्ध नसल्याचे आढळले.
अर्जदाराने आठ ठिकाणांवरील पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल सादर केला असला, तरी जहाज उभे राहणार त्या नेमक्या ठिकाणी नमुने घेतले गेलेले नाहीत. फक्त सांतामोनिका जेटी परिसरातील माहिती उपलब्ध आहे. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाणी आणि गाळाच्या गुणवत्तेचे परीक्षण करून त्याचा आधारभूत डेटा तयार करण्याची शिफारस केली आहे.
महाकाय जहाज...
प्रस्तावित जहाज मांडवी नदीत उभे करण्यात येणार असून हे क्षेत्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा २०११ नुसार सीआरझेड-४ बी अंतर्गत येते. नव्या जहाजाची लांबी ११२ मीटर, रुंदी २८ मीटर असून बेसलाईननपासून पाच स्तरांपर्यंत एकूण उंची २६.५ मीटर आहे.