दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
वास्को येथील मॉडर्न मार्केटमध्ये लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या दुकानदारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) मुरगाव पालिकेच्या सभागृहात १४५ नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. प्रत्येक पीडिताला ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात आली.
तसेच व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी पुढील आर्थिक सहकार्यही लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. वास्को मॉडर्न मार्केटमधील आगग्रस्त दुकानदारांना गोवा सरकारने अवघ्या पाच दिवसांत आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. या आगीत एकूण १०३ दुकानमालकांचे नुकसान झाले होते.
काही दुकानदारांच्या मालकीची तीन ते पाच दुकाने असल्याने प्रत्यक्षात १४५ पीडितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
सोमवारी मुरगाव पालिकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोनकर, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लेट्स, मुरगावचे पोलीस अधीक्षक गुरुदास कदम, उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर, मामलेदार प्रविणजय पंडित, मुरगाव पालिकेचे प्रशासक जयंत तारी, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक,
गोवा मानव संसाधन विकास मंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, माजी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, मॉडर्न मार्केटचे अध्यक्ष मॅन्युअल डिसोझा, सचिव दयाराम केवट तसेच नुकसानग्रस्त दुकानदार आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी आमदार संकल्प आमोनकर यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे आभार मानले.
मॉडर्न मार्केटची तात्पुरती उभारणी एका महिन्यात करण्यात येणार असून, त्यासाठीचे काम लवकरच युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. मार्केटच्या पुनर्बांधणीसंदर्भात आणखी एक विशेष बैठक सरकारी अधिकाऱ्यांसोबत घेण्यात येणार आहे.
तसेच पीडित दुकानदारांना पुन्हा व्यवसाय करता यावा, यासाठी सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाईल. ज्या दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, त्यांना किमान ५० टक्के आर्थिक मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी आमदार साळकर यांनी वास्कोतील तीन मोठ्या इमारती धोकादायक स्थितीत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. या इमारतीबाबत संबंधित विभागाने दुर्घटना घडण्यापूर्वीची आवश्यक उपाययोजना करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
मॉडर्न मार्केटमधील पीडित दुकानदारांच्या पाठीशी सरकार पाहुडेने ठामपणे उभे राहील, असे त्यांनी सांगितले. आमदार कृष्णा साळकर यांनीही सरकार पहिल्या दिवसापासूनच पीडित दुकानदारांच्या पाठीशी असल्याचे नमूद केले. सरकारी यंत्रणेने उत्कृष्ट काम करून नुकसानग्रस्तांना सहकार्य केले असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आलेली मदत त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी उपयोगी ठरेल, असे ते म्हणाले.