प्रतीकात्मक छायाचित्र Pudhari photo
गोवा

Goa Social Media Ban News: सोशल मीडियावर 16 वर्षाखालील मुलांना बंदी येणार?, आयटी मंत्री रोहन खंवटे यांची मोठी घोषणा

Rohan Khaunte Announcement | मोबाईलचा अतिरेक वाढल्याने लहान मुलांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून सरकारकडे येत आहेत

पुढारी वृत्तसेवा

Goa Social Media Ban Under 16

पणजी : मोबाईलचा अतिरेक वाढल्याने लहान मुलांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून सरकारकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान (आयटी) मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या संबंधित कायद्याच्या आधारे गोव्यातील विचारवंत, तज्ज्ञ, पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांची व्यापक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत एक समिती स्थापन करून सोशल मीडियातील कोणते विभाग अल्पवयीन मुलांसाठी बंद करावेत, याबाबत चर्चा केली जाणार आहे. समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाईल किंवा आवश्यक असल्यास दिल्ली येथे माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची भेट घेऊन सादर केला जाईल, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

सध्या मोबाईलचा वापर शिक्षणासाठीही होत असल्याने शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त असलेले विभाग सुरू ठेवून, विद्यार्थ्यांसाठी अनावश्यक असलेले मोबाईल गेम्स आणि इतर गैरगरजेचे घटक बंद करण्याचा विचार आहे. अनेक मुले अभ्यास आणि जेवणाकडे दुर्लक्ष करून दिवस-रात्र मोबाईलवर वेळ घालवतात, रात्री उशिरापर्यंत जागरण करतात, परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पालकांनी मोबाईल वापराबाबत विचारणा केल्यास काही मुले आक्रमक वर्तन करतात, असे प्रकारही समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच १६ वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापराबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे खंवटे यांनी शुक्रवारी नमूद केले.

चर्चेनंतरच पर्यटन क्षेत्रातील बदल

पर्यटन क्षेत्रातील कायद्यात बदल करण्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, कोणताही कायदा बदलण्यापूर्वी सखोल विचार आणि संबंधित घटकांशी चर्चा आवश्यक असते. सुचविलेल्या सुधारणा सर्व संबंधितांशी संवाद साधूनच अंतिम केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT