Ponda Chaturthi Matoli Bazar 
गोवा

Matoli Fruits Vegetables | गोव्यात बाप्पाच्या स्वागताची पूर्ण तयारी; माटोळी बाजारात रानमेव्याची खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी

Matoli Fruits Vegetables | माटोळी बाजाराला बहर ; पूजासाहित्य, फळे, फुले, सजावटींच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस राहिल्याने गोव्यात चतुर्थीच्या तयारीला वेग आला आहे. सोमवार, दि. १४ रोजी घरोघरी बाप्पा विराजमान होणार असल्याने साफसफाई, रंगरंगोटी, सजावट आणि पूजेच्या साहित्याची जमवाजमव अंतिम टप्प्यात आली आहे. बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी गर्दी वाढली असून माटोळीपासून नैवेद्याच्या पदार्थांपर्यंत विविध वस्तूंनी बाजार सजले आहेत.

वास्कोतील बाजारात पूजासाहित्य, फुले, फळे, पत्री, नैवेद्याचे साहित्य, मिठाई, मखर, विद्युत रोषणाई, तोरणे व घर सजावटीच्या वस्तूंना मागणी आहे. व्यापाऱ्यांनीही पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. पालिकेने बाजारात व्यवस्था केली असून वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. पार्किंगची व्यवस्था हिंदुस्थान पेट्रोलियमच्या जागेत करण्यात आली आहे.

चतुर्थीनिमित्त पारंपरिक माटोळी बाजार भरला असून रानफळे, कांगले, कुंडल, धागरे, करमळ, रानकेळी, औषधी वनस्पती आणि जंगली बियाणे विक्रीस आले आहेत. माटोळी साहित्य घरपोच देण्याचा उपक्रमही सुरू झाला आहे. विविध रानमेवा, फळे, भाज्या, कंदमुळे, फुले आणि पाने यांची आरास माटोळीवर केली जाते. ही परंपरा गोमंतकीयांचे निसर्गाशी असलेले नाते अधोरेखित करते.

वाहतूक खर्चामुळे माटोळी साहित्याचे दर गतवर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहेत. तरीही नागरिक खरेदीला प्राधान्य देत आहेत. पारंपरिक विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पारंपरिक माटोळी विक्रेत्यांकडून 'सोपो' वसूल करू नये, असे आदेश दिले आहेत.

नैवेद्याचीही लगबग

गणरायाच्या स्वागताबरोबरच मोदक, पंचखाद्य, केळीचा हलवा यांसारख्या पारंपरिक पदार्थांची तयारी सुरू आहे. चॉकलेट मोदक व विविध मिठाईचे प्रकार बाजारात आले असले तरी पारंपरिक नैवेद्याचे महत्त्व कायम आहे. गोव्याच्या चतुर्थीतील 'वजें' या परंपरेमुळे माहेर-सासरचे नातेही अधिक दृढ होते. घर सजले आहे, माटोळीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आणि नैवेद्याचे नियोजन पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात अवघा गोवा मंगलमूर्तीच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT