Goa News Pudhari
गोवा

Goa Charter Tourism Season | चार्टर पर्यटन हंगामासाठी गोवा सज्ज

Goa Charter Tourism Season | पर्यटन मंत्री रोहन खंवटे : जागतिक हवाई संपर्क विस्तारामुळे परदेशी पर्यटक वाढणार

पुढारी वृत्तसेवा

  • नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर सरकारचा भर

  • बेलारूस, आर्मेनिया, मोल्डोव्हा, बिश्केक येथून नवीन चार्टर

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा आंतरराष्ट्रीय चार्टर पर्यटन हंगामासाठी सज्ज झाला असून जागतिक हवाई संपर्क विस्तारामुळे यंदाच्या हंगामात विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केला. गोव्यातील वैविध्यपूर्ण पर्यटन अनुभवांमुळे जागतिक स्तरावर विश्वास अधिक दृढ होत असून नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा गोव्याकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री खंवटे म्हणाले, ऑक्टोबर २०२६ पासून पावसाळ्यानंतर सुरू होणारी आणि एप्रिल २०२७ पर्यंत चालणारी चार्टर विमानसेवा गोव्याचे भारतातील अग्रगण्य जागतिक पर्यटन स्थळ म्हणून वाढते आकर्षण अधोरेखित करणार आहे.

यंदाच्या हंगामात युनायटेड किंगडम, रशिया, कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि पोलंड या पारंपारिक बाजारपेठांमधून चार्टर उड्डाणे सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर बेलारूस, आर्मेनिया, मोल्डोव्हा आणि बिश्केक (किर्गिझस्तान) येथूनही नवीन चार्टर सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असून, आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजारपेठ अधिक वैविध्यपूर्ण करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले, आघाडीच्या चार्टर ऑपरेटर्सच्या माहितीनुसार, आगामी हंगामात आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. गोव्यातील सर्वात जुन्या आंतरराष्ट्रीय चार्टर ऑपरेटर्सपैकी एक असलेल्या कॉनकोर्ड एक्सोटिक व्हॉयेजेसने २०२६-२७ हंगामात ४५ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कंपनी रशियातून दर आठवड्याला सहा चार्टर उड्डाणे चालविणार असून मागणीनुसार ही संख्या नऊ उड्डाणांपर्यंत वाढविण्याची तयारी ठेवली आहे. तसेच कझाकस्तानमधून दर आठवड्याला दोन उड्डाणे चालविण्यात येणार असून हिवाळ्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

युनायटेड किंगडममधून नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दर आठवड्याला चार चार्टर उड्डाणे चालविण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन उड्डाणे मँचेस्टर येथून, तर दोन लंडन गॅटविक येथून असतील. या उड्डाणांद्वारे दर आठवड्याला सुमारे १२०० पर्यटक गोव्यात येतील.

सीता ट्रॅव्हल्स आणि थॉमस कुक इंडिया यांनीदेखील ऑक्टोबरच्या मध्यापासून एप्रिलपर्यंत युनायटेड किंगडम, रशिया, कझाकस्तान आणि पोलंड येथून चार्टर सेवा सुरू ठेवण्याची पुष्टि केली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत सुमारे १० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे या कंपन्यांनी म्हटले आहे.

बिहाइंड बीचेस पर्यटनावर भर : मंत्री खंवटे

केवळ किनारी पर्यटनापुरते मर्यादित न राहता वारसा पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन, वेलनेस, साहसी पर्यटन, ग्रामीण व अंतर्गत भागातील अनुभव तसेच शाश्वत पर्यटन यावर सरकारने भर दिला असून त्याला आंतरराष्ट्रीय पर्यटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क वाढविणे, पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पाठबळ देणे, स्थानिक समुदायांना फायदेशीर ठरणारे अर्थपूर्ण पर्यटन अनुभव निर्माण करणे आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देणे यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT