St Francis Xavier Controversy
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या गौतम खट्टर याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
न्यायालयाने खट्टर याला जामीन देताना काही कठोर अटी घातल्या आहेत. त्यानुसार, त्याने प्रत्येकी १५ हजार रुपयांचे दोन जामीनदार सादर करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक दोन नातेवाईकांचे पत्ते व संपर्क क्रमांक न्यायालयात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर प्रवास करता येणार नाही, तसेच भविष्यात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली आहे.
या प्रकरणात यापूर्वी न्यायालयाने खट्टर याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सुनावणीनंतर आज जामीन अर्जावर अंतिम निर्णय देण्यात आला.
सध्या गौतम खट्टर हा बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचार घेत असून, त्याची प्रकृती लक्षात घेऊनही न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी घेत निर्णय दिला.