पणजी : विठ्ठल गावडे-पारवाडकर
सध्याच्या घडीला सत्ताधारी भाजपनंतर गोवा फॉरवर्ड या पक्षाने निवडणुकीची विजय सरदेसाई तयारी सुरू केलेली आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी चांगली मते मिळाली होती, असे १० मतदारसंघ हेरून तेथे गट अध्यक्ष नेमले आहेत.
दरम्यान, पक्षाने एका एजन्सीची नियुक्ती केली असून ही एजन्सी गोव्यातील कोणकोणत्या मतदारसंघात गोवा फॉरवर्डला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, याबाबत लोकांशी चर्चा करून पक्षाला महिनाभरात अहवाल देणार आहे. त्यानंतर नेमके किती मतदारसंघ विधानसभेसाठी लढवावेत, याबाबत पक्ष निर्णय घेणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. विशेष सरदेसाई यांनी शनिवारी 'पुढारी'शी बोलताना सांगितले की, पक्षाने दहा मतदारसंघांत गट अध्यक्ष निवडले असून आता तेथे इतर पदाधिकारी नियुक्त केले जातील.
त्यानंतर त्या-त्या मतदारसंघात मेळावे घेतले जातील. मेळाव्याला मिळणारा प्रतिसाद पाहिला जाईल, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली. पक्षाच्या उमेदवारीवर राज्यात यापूर्वी तीन आमदार निवडून आले होते. विधानसभा निवडणूक गोव्यातील लोकांत सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात रोष आहे, त्याचा लाभ निश्चितपणे आपल्या पक्षाला मिळेल. काँग्रेससोबत आम्ही अनेक वर्षांपासून युतीत आहोत. काँग्रेसने लवकरच युतीची बोलणी करावी, जागा ठरवाव्यात, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटते.
काँग्रेससोबत गोवा फॉरवर्डची युती होईल, असे गृहीत धरूनच आम्ही निवडणुकीची तयारी करत असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. एजन्सीचा अहवाल एक दीड महिन्यात मिळेल, त्यानंतर निश्चितपणे विधानसभा निवडणुकीच्या एकूणच रचनेला आणि प्रचाराला पक्ष गती देणार असल्याचे सांगून राज्यातील काही माजी आमदार, माजी मंत्री पक्षात येऊ इच्छितात, अशी माहितीही त्यांनी दिली.
मात्र, याबाबत अद्याप तरी निर्णय घेतलेला नाही, वेळ येईल त्यावेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सरदेसाई म्हणाले. सरदेसाई हे सध्या तरी विरोधी पक्षातील प्रमुख नेते असून विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता आहे, ते सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत. इतर सहा विरोधी आमदार पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्ये सरदेसाई यांनी सुमारे अडीच वर्षे उपमुख्यमंत्रिपद भूषवले आहे.
विजय सरदेसाई यांनी काँग्रेसमध्ये जावे आणि काँग्रेसचे नेतृत्व करावे, असे अनेक गोमंतकीयांना वाटते. मात्र काँग्रेसच्या नेत्यांकडून लोकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, सरदेसाई हे काँग्रेसमध्ये न जाता स्वतंत्रपणे पुन्हा एकदा निवडणुकीला सामारे जाण्यास सिद्ध झाले असून त्यांच्या पक्षाने दहा जागी काम सुरू केले आहे.
तीन पैकी एका जागी विजय
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोवा फॉरवर्ड पक्षाला काँग्रेसने फक्त तीन जागा सोडल्या होत्या. त्यात फातोर्डा, मये व मांद्रे या मतदारसंघांचा समावेश होता, मात्र, मये व मांद्रे येथील पक्षाचे उमेदवार अनुक्रमे संतोषकुमार सावंत व दीपक कळंगुटकर यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर फातोर्डात सलग तिसऱ्यांदा विजय सरदेसाई निवडून आले.
दहा जागी गट अध्यक्ष नियुक्त
मांद्रे, पेडणे, कुंभारजुवे, मये, शिरोडा, मुरगाव, कुठ्ठाळी, फातोर्डा, सांगे व काणकोण या दहा मतदारसंघांसाठी गट अध्यक्ष नियुक्त करून गोवा फॉरवर्ड पक्षाने निवडणुकीची तयारी तयारी सुरू केली आहे