पणजी : पुढारी वृत्तसेवाआगामी २०२७ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीबाबत धुमशान सुरू आहे. गोवा फॉरवर्डने आता स्वतंत्र लढणार असल्याचे सूतोवाच करत युतीच्या चर्चेला तूर्तास ब्रेक दिला आहे. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना गोवा फॉरवर्ड पक्षाने सध्या स्थगिती दिली आहे. पक्षाने यापुढे संपूर्ण लक्ष संघटनात्मक बांधणीवर केंद्रित करण्याचा निर्णय पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोलयेकर म्हणाले की, काँग्रेसकडून प्रत्येक निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबविल्या जातात. याचा अनुभव गोवा फॉरवर्डलाही पूर्वी आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या या पहिल्याच राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचे व समितीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. हल्लीच काँग्रेसने विरोधी पक्षांची बैठक बोलावताना अध्यक्षांना निमंत्रण देण्यावरून केलेल्या टोलवाटोलवी संदर्भात गंभीर दखल घेण्यात आल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.
भाजपला पराभूत करणे हे गोवा फॉरवर्डचे प्रमुख उद्दिष्ट कायम आहे. मात्र त्यासाठी पक्ष प्रथम स्वतःची संघटनात्मक ताकद वाढवणार असून त्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेतले जातील. तसेच सरकार विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा लोलयेकर यांनी दिला.
पक्षाने राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये आपली संघटना विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय बैठका घेऊन तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे पक्षाने ठरवले असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने दोनदा फसवले; आता स्वतंत्र लढणार!
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसवर थेट निशाना साधला. गोव्यातील जनतेला काँग्रेसने दोन वेळा फसवले असून, आता तिसऱ्यांदा तसे होऊ नये, अशी भावना जनतेत असल्याचा दावा त्यांनी केला. आता स्वतंत्र लढणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीनंतर सरदेसाई म्हणाले की, काँग्रेसने सहयोगी पक्षांची निराशा केली आहे. एक दिवस चर्चा पुढे सरकते तर दुसऱ्या दिवशी ती पुन्हा थांबते. या सततच्या अनिश्चिततेला कंटाळा आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष कोणत्याही राजकीय अनिश्चिततेत अडकून न पडता जनतेच्या हितासाठी स्वतंत्रपणे लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रयत्न सुरूच राहणार : गिरीश चोडणकर
राज्यातील जनतेच्या हितासाठी भाजपला पराभूत करण्याकरिता सर्व समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. युतीची चर्चा स्थगित करण्याच्या गोवा फॉरवर्डच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, ही त्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. गोव्याच्या कल्याणासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम काँग्रेस सुरूच ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.