गोवा

Goa Politics | गोवा राजकारणात मोठा भूकंप! 'आप' आणि गोवा फॉरवर्डची नवी आघाडी; काँग्रेसला मोठा धक्का

Goa Politics | काँग्रेसला धक्का : तिसऱ्या आघाडीचे घुमट वाजले

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आगामी विधानसभेच्या २०२७ च्या निवडणुकीसाठी तीन आघाड्यांत तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोवा फॉरवर्ड व आम आदमी पक्षाने काँग्रेसपासून दूर राहून वेगळी चूल थाटल्याचे स्पष्ट करताना काँग्रेस व भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करणारे भव्य बॅनर राज्यात लावले आहेत.

काँग्रेस व भाजपने दोन वेळा गोवेकरांना फसवले. आता तिसऱ्या वेळीही फसवतील, असे या बॅनरवर लिहिलेले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस-आरजी, भाजप-मगो आणि गोवा फॉरवर्ड-आप यांची युती अशा तीन आघाड्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून "मी आज गोव्यात एक खूप मोठी घोषणा करण्यासाठी जात आहे," असा थेट संदेश दिल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी ३ वा. युतीसंदर्भात घोषणा करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
गोवा फॉरवर्ड व आपच्या युतीची घोषणा त्या पक्षांनी लावलेल्या बॅनरमुळे शनिवारी झाली. पणजीहून मडगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला गोवा फॉरवर्ड आणि आपने हे काँग्रेस व भाजपवर टीका करणारे मोठे बॅनर लावले आहेत.

भाजपा-मगो युती राहील का?

भाजप व मगो पक्षात राष्ट्रीय स्तरावर युती झालेली आहे, मगो एनडीएचा भाग आहे. सध्या मगोचे दोन आमदार आहेत. मात्र, काल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मगो पक्षाने आपली क्षमता पाहून वागावे, असा एक प्रकारे इशारा दिला.

वेळ्ळी व बाणावलीवरून संघर्ष

काँग्रेस व आम आदमी पक्षात बाणावली आणि वेळ्ळीच्या जागांवरून संघर्ष आहे. या दोन्ही जागी आपचे आमदार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत येथे काँग्रेसला यश मिळाले आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवरून दोन्ही पक्षात वारंवार खटके उडत होते. त्यामुळे या पक्षांची युती होण्याची शक्यता दिसत नव्हती. शेवटी आम आदमी पक्षाने काँग्रेसची साथ सोडून गोवा फॉरवर्डबरोबर जाणे पसंत केले आहे. त्याची घोषणा मात्र बॅनरद्वारे नाट्यमयरित्या जाहीर करण्यात आली.

तिसऱ्या, चौथ्या आघाडीने फरक पडणार नाही!

गोव्यात तिसरी किंवा चौथी आघाडी स्थापन झाल्याने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जिंकण्याच्या शक्यतांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट मत जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले. भाजप यावेळी ३० जागा जिंकणार असून, याबाबत आपल्याला विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.
- सुभाष शिरोडकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT