हरमल : हरमल व मांद्रे किनारी भागात कर्नाटक तसेच अन्य राज्यांतील ट्रॉलरकडून होणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला असून त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित खात्याचे धोरण कुचकामी ठरत असल्याची टीका होत असून किनारी पोलिसांचे प्रयत्न अपुरे पड़त असल्याने नाममात्र कारवाईवर व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यात मत्स्य खाते व किनारी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले असले तरी इतर भागांतही अशाच प्रकारे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोव्याच्या सागरी हद्दीत बाहेरील मोठ्या ट्रॉलरचा बिनदिक्कत प्रवेश सुरू असून ते मोठ्या प्रमाणात मासळीची शिकार करून निघून जात असल्याचे चित्र आहे. याबाबत किनारी पोलिस स्थानक निरीक्षकांना वारंवार माहिती देऊनही अधिकारी घटनास्थळी
पोहोचेपर्यंत ट्रॉलर हद्दीबाहेर गेलेले असतात, त्यामुळे कारवाई होत नसल्याची खंत व्यावसायिक साकु डिमेलो यांनी व्यक्त केली. मागील पंधरा दिवसांपासून व्यवसाय तोट्यात चालू असून पेट्रोलचा खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. याशिवाय कामगारांचे हॉटेल वेतन, जाळ्याचा खर्च यामुळे आर्थिक ताण वाढला आहे. यांत्रिक बोटींसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले असून बँकांकडून सतत संपर्क होत आहे, मात्र पैसे भरावेत कसे, असा प्रश्न व्यावसायिक इझाबेल रॉड्रिग्ज आणि इतरांनी उपस्थित केला.
व्यवसायिकांच्या मागणीनुसार मासळीचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्यातही नाराजी आहे. पर्यटन हंगाम उत्तरार्धात असताना चांगल्या मासळीची अपेक्षा होती, मात्र ताज्या मासळीचा तुटवडा जाणवत आहे. फॉर्मेलिनयुक्त मासळीच्या भौतीमुळे अनेक ग्राहक शीतगृहातील मासळी टाळत असून समुद्रातील ताज्या मासळीची मागणी वाढली असतानाही पुरवठा अपुरा आहे. या पार्श्वभूमीवर सरकार व संबंधित विभागाने ठोस पावले उचलून बेकायदेशीर ट्रॉलर मासेमारीवर बंदी घालावी आणि स्थानिक मच्छीमारांना दिलासा देत त्यांच्या उत्पन्नाची हमी द्यावी, अशी मागणी होत आहे.