पणजी : पुढारी वृत्तसेवा
झारखंडमधील जमशेदपूर येथे आयोजित ५४व्या राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्तर इथन वाझने राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ अजिंक्यपद विजेतेपद जिंकून क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.
हा विजय मिळवणारा तो पहिला गोमंतकीय बुद्धिबळपटू ठरला आहे. १६ ते २४ डिसेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेचे आयोजन झारखंड बुद्धिबळ संघटना आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या वतीने सरायकेला खरसावन जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले होते.
गोव्याने ९ वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे, यापूर्वी मुलींच्या गटात आयएम भक्ती कुलकर्णीन हे विजेतेपद पटकावले होते. यावेळी इथनने स्पर्धेत वर्चस्व गाजवत नवव्या फेरीत दुसऱ्या मानांकित आयएम मोहम्मद इम्रान आणि सातव्या फेरीत आसामच्या आयएम मयंक चक्रवर्ती यांचा पराभव केला.
त्याने १० व्या फेरीत गुजरातच्या एफएम विवाण विशाल शाह आणि अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या एफएम जयवीर महेंद्र यांच्यावरही शानदार विजय मिळवला. शेवटच्या फेरीत केवळ बरोबरीची गरज असतानाही, इथनने विजयासाठी प्रयत्न केले आणि विजयही संपादन केला. गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांनी इथन वाझचे त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले.