बांदा : गोव्यात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि दंड प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केरी, पत्रादेवी आणि पोळे या महत्त्वाच्या चेकनाक्यावर ९ डिसेंबर २०२५ पासून Goa Vehicle Authentication System (GoVA) ही आधुनिक इलेक्ट्रॉनिक तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
GoVA प्रणाली म्हणजे काय?
ही एक अत्याधुनिक डिजिटल व्यवस्था असून वाहनांची ओळख, नोंदणी, पूर्वीचे दंड, विमा, पोल्यूशन प्रमाणपत्र यांसारखी सर्व माहिती अधिकाऱ्यांना मोबाईल डिव्हाइसवर तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तपासणी प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहे.
राज्य वाहतूक विभागाने सांगितले की, आधुनिक इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे मानवचुकांची शक्यता कमी होईल आणि नियमभंग रोखण्यात मोठी मदत होईल. तसेच, अधिकाऱ्यांना ‘GoVA’ ॲपद्वारे सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची माहिती या प्रणालीद्वारे स्कॅन केली जाणार असून कोणताही प्रलंबित दंड, विमा नसणे, फिटनेस नसणे किंवा इतर नियमभंग असल्यास जागेवरच दंड प्रक्रिया सुरू केली जाईल.
काय बदल होणार? :-
१) चेकनाक्यांवर हाताने तपासणी करण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग
२)वाहन धारकांकडून नियमभंग आढळल्यास तात्काळ डिजिटल दंड आकारणी
३)रोख व्यवहारांना पूर्ण विराम
४) सर्व दंड ऑनलाइन पद्धतीने
५) बनावट दस्तऐवज वा नंबर प्लेट ओळखणे अधिक सुलभ
कोठे सुरू होणार आहे?
९ डिसेंबरपासून पुढील राज्यातील तिन्ही सीमांवर GoVA प्रणाली सुरु होईल :
केरी
पत्रादेवी
पोळे
वाहनचालक यांनी घ्यावयाची काळजी :-
वाहनाचे विमा, PUC, फिटनेस आणि परवाना अद्ययावत ठेवा
कोणताही प्रलंबित दंड असल्यास आधीच भरावा
गोवा सरकारच्या या निर्णयामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे