Goa Night Club Accident | ‘महबूबा.. महबूबा’वर डान्सरचा ठेका... अन् भडका उडाला

Goa Night Club Accident
Goa Night Club Accident | ‘महबूबा.. महबूबा’वर डान्सरचा ठेका... अन् भडका उडालाPudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : गोव्यातील हडफडे (अरपोरा) परिसरात असलेल्या ‘बिर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री ‘बॉलीवूड बँगर नाईट’ सुरू होती. डान्सफ्लोअरवर बेली डान्सर ‘महबूबा-ओ-महबूबा’ गाण्यावर डान्स करीत होती. म्युझिशियन रंगात आले होते, समोर नाचणारे युवकही झिंगाट थिरकत होते.. त्याचवेळी तेथे लावण्यात आलेल्या लाईटस्ने (इलेक्ट्रो पायरो गन) पेट घेतला आणि क्षणार्धात आग लागली. या अनपेक्षित घटनेने म्युझिशियन तसेच उपस्थित असलेले सर्वजण सैरावैरा पळू लागले. तोपर्यंत आग जास्तच भडकली. क्षणापूर्वी तेथे असलेल्या रंगारंग वातावरणाची जागा किंकाळ्या, आरोळ्या आणि गोंधळाने घेतली... आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले होतेे. बाहेर पडण्याचा मार्ग खूप अरुंद होता. त्यामुळे लोक बाहेर पडू शकले नाहीत. काही मिनिटांतच संपूर्ण क्लब आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तिथे पामच्या पानांनी सजावट केली होती, जी लगेच जळून खाक झाली. अनेक लोक कसेबसे बाहेर पडले, पण काहीजण आतच अडकले. या आगीत 25 लोकांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी क्लबमध्ये सुमारे 100 लोक उपस्थित होते.

डेक आणि डान्स फ्लोअरवर काय सुरू आहे, याची यत्किंचित कल्पना किचनमधील कर्मचार्‍यांना नव्हती. तोपर्यंत आगीच्या धुराचे लोट किचनमध्ये पोहोचले. तोपर्यंत उशीर झाला होता. काळ्या कुट्ट धुरामुळे त्यांना बाहेर येण्यासाठी रस्ताच दिसेनासा झाला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले बहुतेकजण गुदमरून मृत्युमुखी पडले. दरम्यान, क्लबमध्ये लागलेल्या आगीची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलाचे बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. क्लबमध्ये असलेले काही पर्यटक तेथून बाहेर जाण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे ते बचावले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या बंबांना रस्ता अरुंद असल्याने थेट पोहोचता आले नाही. त्यामुळे संपूर्ण लाकडी नाईट क्लब खाक झाला होता. घटनास्थळी काळे ठिक्कर मृतदेह पडल्याचे विदारक चित्र दिसत होते. ते गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. त्यांची ओळख पटवणे सुरू आहे. क्लबच्या कर्मचार्‍यांच्या युनिफॉर्मवरून मृत झालेले कर्मचारी 14 असले तरी त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, गोव्याचे पोलिस महासंचालक अलोक कुमार तसेच अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव व अधिकारी घटनास्थळी दाखल झालेे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य सुरू झाले.

मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिष मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या मृतदेहांची शव चिकित्सा सुरू आहे. एकूण 25 मृतदेहांपैकी 8 ते 10 जणांची ओळख पटली आहे. या आगीला जबाबदार असलेल्यांविरुद्ध हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. मृतदेहांची राख झाल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात अडचण यत आहे, असे त्यांनी सांगितले.

पाचजणांची प्रकृती स्थिर

आरोग्य सचिव यतींद्र मरळकर यांनी गोमेकॉ इस्पितळात जाऊन या आगीत जखमी झालेल्यांची भेट घेतली. त्यानंतर माहिती देताना ते म्हणाले, या आगीत बचावलेल्या पाचजणांची प्रकृती स्थिर आहे. त्यामध्ये 4 पुरुष 12 टक्के होरपळले आहेत तर एक 20 वर्षीय तरुणी 29 टक्के भाजली आहे. मात्र त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे ते म्हणाले.

विशेष अधिकार्‍यांची नियुक्ती

या आगीच्या घटनेनंतर तातडीने जिल्हा उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. ज्या 25 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना तसेच नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कठोर उपाययोजना करणे गरजेचे

हडफडे येथील आगीची दुर्घटना ही अत्यंत दुःखद आहे. यात निष्पापांचा बळी गेला आहे. मुख्य सचिवांमार्फत सर्व खात्यांच्या समन्वयाने या घटनेचा आढावा घेतला जात आहे. या दुर्घटनेत होरपळलेल्या जखमींवर इस्पितळात योग्य उपचार होतील. मात्र अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने आवश्यक कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news