election news File Photo
गोवा

Goa Election 2027 | नाराजांचे बंड थोपविण्याचे भाजपसमोर आव्हान

Goa Election 2027 | साळगाव मतदारसंघात परुळेकर नाराज; काँग्रेस उमेदवाराबाबत संभ्रम

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : रमेश नाईक

आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी साळगाव मतदारसंघात भाजपची उमेदवारी कोणाला मिळेल, याची चर्चा रंगू लागली आहे. साळगावचे माजी आमदार दिलीप परुळेकर हे २०२२ पासून तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. प्रसारमाध्यमांतून त्यांची ही नाराजी समोर आली आहे. २०२२ मध्ये केदार नाईक यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर विजय मिळविला होता.

या विजयात भाजपच्या पक्षांतर्गत असंतोषाचाही महत्त्वाचा वाटा होता. २०२७ मध्ये पक्ष या नाराज गटांचे बंड कशाप्रकारे थोपवतो आणि कोणाला उमेदवारी देतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गोव्याला ३० मे १९८७ रोजी घटकराज्याचा दर्जा मिळाल्यानंतर विधानसभेच्या जागा ३० वरून ४० वर गेल्या. त्यातून साळगाव हा नवीन मतदारसंघ निर्माण करण्यात आला.

१९८९ च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत साळगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर डॉ. विल्फ्रेड डिसोझा निवडून आले होते. त्यावेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे पुनाजी आचरेकर यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती. १९९४ मध्ये पुन्हा काँग्रेसचे डॉ. विल्फ्रेड डिसोझा विजयी झाले. त्यांना शिवसेनेचे दिलीप कळंगुटकर यांनी चांगली टक्कर दिली होती.

१९९९ च्या निवडणुकीत डॉ. विल्फ्रेड डिसोझा हे त्यांनी स्थापन केलेल्या गोवा राजीव काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. १९९८ मध्ये त्यांनी हा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर २००२ मध्ये डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यांच्या विरोधात त्यांचे माजी स्वीय सचिव ट्रोजनो डिमेलो यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, त्यांचा ७२६ मतांनी पराभव झाला होता.

२००७ मध्ये प्रथमच भाजपचे उमेदवार दिलीप परुळेकर यांनी जायंट कीलर ठरत डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांचा पराभव केला. २०१२ मध्ये दिलीप परुळेकर यांनी मोठ्या मताधिक्क्याने अपक्ष उमेदवार तुलियो डिसोझा यांचा पराभव केला. २०१७ मध्ये गोवा फॉरवर्डचे उमेदवार जयेश साळगावकर यांनी भाजपचे दिलीप परुळेकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी ते साळगावचे जिल्हा पंचायत सदस्य होते.

२०२२ मध्ये जयेश साळगावकर यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्याचाच परिणाम २०२२ च्या निवडणुकीवर झाला. त्यावेळी भाजपच्या अंतर्गत बंडाळीचा उद्रेक झाला. २०२२ च्य निवडणुकीत काँग्रेसचे केदार नाईक यांनी भाजपचे जयेश साळगावकर यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनीह भाजपमध्ये प्रवेश केला.

दोन नेते एक महिला तयार

या मतदारसंघातून काँग्रेसचे दोन नेते आणि एक महिला नेत्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र, मतदारसंघातील काही भागांत काँग्रेसचे समर्थन करणारे मतदार आजही पक्षासोबत आहेत; पण काँग्रेसच्या नेत्यांवर त्यांचा विश्वास उरलेला नाही, असे मतदारसंघात जाणवते.

भाजपकडून केदार नाईकना संधी

येत्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार केदार नाईक यांनाच भाजपची उमेदवारी मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. असे असले तरी माजी आमदार तथा मंत्री दिलीप परुळेकर यांनी यावेळी निवडणूक लढवण्याचा चंग बांधलेला आहे. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे. आपणाला भाजपाची उमेदवारी मिळेल, असे ते छातीठोकपणे सांगत आहेत.

विली डिसोझांचा विक्रम

साळगाव मतदारसंघातून विली डिसोझा दोनदा काँग्रेस, एकदा गोवा राजीव काँग्रेस व एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत. एकाच मतदारसंघात तीन पक्षांतून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT