Karad Politics: काँग्रेसची पिछेहाट, सेनेची एन्ट्री,भाजपात बंडाळी

कराड तालुक्यात महायुतीत मतभेद; भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र, अपक्षही रिंगणात
Local body elections
Satara ZP ElectionPudhari Photo
Published on
Updated on
चंद्रजीत पाटील

कराड : सलग सात दशके काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात वारुंजी आणि रेठरे वगळता काँग्रेसला उमेदवार मिळालेले नाहीत. त्याचवेळी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपमधील नाराजीचा फायदा घेत शिवसेनेने चंचूप्रवेश केला आहे. कराड दक्षिणमध्ये वारुंजी वगळता अन्य जिल्हा गटात भाजप व राष्ट्रवादी या महायुतीतील घटक पक्षात लढाई होत आहे. तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमुळे चुरस निर्माण झाली आहे. भाजप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होत असून मत विभाजनाचा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर सलग सात दशके काँग्रेसने एकतर्फी वर्चस्व राखले होते. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला. हा पराभव करणारे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले आहे. त्यातच ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर, नरेंद्र नांगरे - पाटील, शंकरराव खबाले, जयवंतराव जगताप यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.

दीड वर्षापूर्वीपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रेठरे बुद्रूक, काले, येळगाव, विंग - कोळे, कार्वे आणि वारुंजी या जिल्हा परिषद गटापैकी केवळ वारुंजीत काँग्रेसला उमेदवार मिळाले आहेत. जिल्हा परिषद गटाची अशी अवस्था असताना दक्षिणमधील रेठरे बुद्रुक पंचायत समिती गणात काँग्रेसचा उमेदवार उभा आहे. कराड दक्षिणमधील सहा जिल्हा परिषद गटापैकी केवळ वारुंजी या एकाच जिल्हा परिषद गटात आणि रेठरे बुद्रुक पंचायत समिती गणात काँग्रेसला उमेदवार मिळाले असल्याने काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे कराड दक्षिणमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट झाल्याचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पहावयास मिळत आहे.

या मतदारसंघात एकीकडे अशी अवस्था असताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी भाजपला शह देण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे पहावयास मिळत आहे. वारुंजी वगळता कराड दक्षिणमधील अन्य जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या महायुतीतील घटक पक्षांमध्ये थेट लढाई होत आहे. या सर्व ठिकाणी शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अविनाश मोहिते उदयसिंह पाटील यांच्यासोबत आहेत. तर वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेस उमेदवारांना ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी यांनी पाठिंबा दिला आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मनोज घोरपडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यात वर्चस्वासाठी राजकीय संघर्ष सुरू आहे. निवड प्रक्रियेवर नाराज होत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या वेताळ कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या जिल्हा परिषद गटात वाघेरी आणि कोपर्डे हवेली गणातील अपक्षांना मदतीला घेत रामकृष्ण वेताळ आघाडी करण्याचा प्रयत्नात आहेत.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर यांच्याकडून मसूर जिल्हा परिषद गटात असाच प्रयत्न सुरू आहे. प्रमोद गायकवाड हेही रिंगणात असल्याने मोठी चुरस पहावयास मिळत आहे. या मतदारसंघातील पाल, उंब्रज जिल्हा परिषद गटातील भाजपच्या नाराज उमेदवारांनी माघार न घेता शिवसेना शिंदे गटाच्या मदतीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघातील चार जिल्हा परिषद गटात सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप उमेदवार आमने-सामने असले तरी शिवसेना उमेदवारांसह अपक्षांमुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.

सैदापूर हा जिल्हा परिषद गट कराड दक्षिण विधानसभा आणि कराड उत्तर विधानसभा या दोन्ही मतदारसंघात समाविष्ट आहे. या गटातही भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीत लढत होत आहे. या ठिकाणीही मत विभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. तर कराड तालुक्यातील तांबवे जिल्हा परिषद गटाचा पाटण विधानसभा मतदारसंघात समावेश असून या ठिकाणी भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात मोठी चुरस पहावयास मिळत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी सर्व ताकत शिवसेना शिंदे गटाच्या पाठीशी उभी केली आहे. त्यातच काँग्रेसने उमेदवार उभे केले असल्याने मत विभाजन या ठिकाणीही होईल अशीच परिस्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news