एडबर्गची विचारपूस करताना चिराग दत्ता नायक. 
गोवा

Goa | कोठडीतील मारहाणीनंतर एडबर्ग अजूनही अंथरुणावर, दीर्घ उपचारांची गरज : प्रकरणाच्या अंतिम तपासाकडे लक्ष

Edberg bedridden after custodial assault - कोठडीतील मारहाणीनंतर एडबर्ग अजूनही अंथरुणावर, दीर्घ उपचारांची गरज : प्रकरणाच्या अंतिम तपासाकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पोलिस कोठडीत झालेल्या कथित मारहाणीत गंभीर दुखापत झाल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनंतरही एडबर्ग परेरा यांची उपचारांची लढाई संपलेली नाही. मेंदूमध्ये झालेल्या रक्तस्रावामुळे शस्त्रक्रिया आणि दीर्घकाळ रुग्णालयातील उपचारांना सामोरे जावे लागलेल्या एडबर्ग यांना १४ मार्च २०२६ रोजी घरी सोडण्यात आले असले, तरी ते अजूनही अंथरुणावर आहेत. शरीराची हालचाल आणि बोलण्याची क्षमता सुधारण्यासाठी उपचार सुरू आहेत.

कुटुंबीयांसाठी ही केवळ एका दिवसाची नव्हे, तर दीर्घ पुनर्वसनाची आणि मोठ्या खर्चाची लढाई ठरली आहे. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी मडगाव पोलिस ठाण्यात घडलेल्या या घटनेचा तपास आता गुन्हे शाखेकडे आहे. प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले आहे. एडबर्गला २२ ऑक्टोबर रोजी नावेली येथील रोझरी महाविद्यालयाजवळ सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पोलिसांच्या अधिकृत भूमिकेनुसार, त्याला मडगाव पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तो आक्रमकपणे वागत होता. कर्तव्यावरील पोलिस उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असताना एडबर्गचा तोल गेला आणि तो जमिनीवरील कठड्यावर पडल्याने डोक्याला दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या स्पष्टीकरणावर कुटुंबीयांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

प्रतिमा कुतिन्हो, चिराग नायक यांचा पुढाकार

एडबर्गच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली. १४ मार्च २०२६ रोजी त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर घरच्या घरी त्याची देखभाल सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनीही त्याच्या उपचारांसाठी आणि पुनर्वसनासाठी लोकांनी प्रार्थना व मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. सामाजिक कार्यकर्ते चिराग दत्ता नायक यांनी एडबर्गची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. 'चिराग दत्ता नायक पुढाकार' या उपक्रमांतर्गत त्यांनी एडबर्गच्या वैद्यकीय देखभालीसाठी फाऊलर बेड देत कुटुंबाला मदतीचा हात दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT