पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील अमलीपदार्थांच्या व्यापारात आता अल्पवयीनांचा सहभाग वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. काही दिवसांच्या अंतराने उघड झालेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांत तीन अल्पवयीनांचा सहभाग आढळून आल्याने या प्रकाराकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. राज्यात नोकरीनिमित्ताने आलेले मजुरांची अल्पवयीन मुले शाळेत जात नाहीत त्यामुळे ती लहानमोठे काम करून ड्रग्ज व्यवसायत गुंतली आहेत.
अलिशान वाहने व मोबाईलच्या आकर्षणामुळे हे परप्रांतीय मुलाचे ड्रग्ज जाळे गोव्यात हळुहळू पसरत आहे. अल्पवयीनाचा फायदा घेऊन ते या ड्रग्ज पुरवठा व्यवसायात येत आहेत. ड्रग्ज माफिया त्याना मोठी स्वप्ने दाखवून याकडे आकर्षित करत आहेत. त्यामुळेच शाळेत न जाणारे, शाळा सोडलेले व गरिबीमुळे काही परप्रांतीय अल्पवयीन मुले झटपट पैसा मिळवण्याच्या नादात या ड्रग्ज व्यवसायात ओढली जात आहेत,
अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सुमारे ६८ लाख रुपयांच्या ड्रग्ज जप्ती प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका प्रौढ संशयिताने चौकशीदरम्यान आपल्याला पुकवठा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे नाव उघड केले. त्यानुसार अंमलीपदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) त्या मुलाचा शोध घेऊन त्याला जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर (जेजेबी) हजर केले.
बोडनि त्याला मेरशी येथील 'अपना घर' येथे ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात विशेष बाब म्हणजे संबंधित एका मुलाचे वडीलही अमलीपदार्थ प्रकरणात तुरुंगात आहेत. तसेच हा मुलगा एका व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात शिकत असून वाहन शोरूममध्ये इंटर्नशिप करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून प्रत्यक्ष ड्रग्ज जप्त झाले नसले तरी तो ग्राहकांना ड्रग्ज पुरवत असल्याचा आरोप आहे. त्याच्या नेटवर्कचा स्रोत, वितरण व्यवस्था आणि ग्राहक तपास सुरू आहे.
दरम्यान, कुटुंबीयांनी त्याच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, ७ एप्रिलच्या पहाटे म्हापसा येथे दुसऱ्या कारवाईत आणखी एक धागा समोर आला. बोडगेश्वर मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात एएनसीने सापळा रचून विजय सिंग (२४) या तरुणाला सुमारे ५ ग्रॅम गांजासह ताब्यात घेतल्यानंतर त्याने चौकशीत उघड केलेल्या माहितीनुसार तीन अल्पवयीनांचा सहभाग समोर आला असून ते दोघेही हायस्कूल सोडून हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यापैकी एक अल्पवयीन सध्या फरार आहे. दरम्यान, गोवा पोलिसांनी इंदूर येथील २१ वर्षीय पर्यटक ईशान सिंग बदगुजर यांच्या मृत्यू प्रकरणातील तपासही वाढवला आहे.
गोवा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी प्राथमिक तपासात 'ड्रग्जचा कॉकटेल' आणि मद्याचे मिश्रण आढळल्याचे सांगितले आहे. या घटनांमुळे गोव्यातील ड्रग्ज जाळे आता शाळा, कमी उत्पन्न गट आणि विशेषतः अल्पवयीनांपर्यंत पोहोचत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.