पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्यटन क्षेत्रांमध्ये वाढलेल्या ड्रग्ज नेटवर्कच्या संपर्कात येणारे तरुण लालसा व झटपट पैसा कमावण्याच्या मोहामुळे अवैध व्यवसायाकडे वळत असल्याचे गोवा पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. यासोबतच मित्रपरिवाराचा दबाव हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ड्रग्ज प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण २५६ गोमंतकीयांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार आर्थिक फायद्याची लालसा आणि झटपट पैसा कमावण्याचा मोह ही तरुणांच्या ड्रग्ज व्यवहारातील सहभागामागील प्रमुख कारणे आहेत.
पर्यटन आणि नाइटलाईफ क्षेत्रांतील विद्यमान ड्रग्ज नेटवर्कशी संपर्क आणि मित्रपरिवाराचा प्रभाव यामुळे स्थानिक तसेच बिगर गोमंतकीय तरुण या जाळ्यात अडकत आहेत. ड्रग्जविरोधी कारवाईसाठी गोवा पोलिसांनी पाळत वाढवली असून गुप्त माहिती संकलन, कम्युनिटी पोलिसिंग आणि सामाजिक कल्याण व शैक्षणिक संस्थांसोबत समन्वय वाढवण्यात आला आहे.
तसेच प्रतिबंधात्मक आणि पुनर्वसनात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत अशी माहिती दिली आहे. किनारी भागातील बार, रेस्टॉरंट्स आणि शॅक्सवर अचानक तपासणी केली जात असून, पर्यटनस्थळांवर बीट कर्मचारी, पीसीआर वाहने आणि मोटारसायकलद्वारे सतत गस्त ठेवली जात आहे.
विशिष्ट ठिकाणी एकात्मिक नाकाबंदी (नाकाबंदी) करून तपासणी केली जात आहे. तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
ड्रग्जचे दुष्परिणाम समजावून सांगत त्यांना व्यसन आणि अवैध व्यापारापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे उत्तरादाखल माहिती दिली आहे. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जप्त केलेले ड्रग्ज नष्ट करण्यासाठी संबंधित कागदपत्रे 'नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस डिस्पोजल कमिटी' समोर सादर केली जातात. पडताळणीनंतर ही औषधे बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितमधील इन्सिनरेटरमध्ये नष्ट केली जातात, असे उत्तर विचारलेल्या प्रश्नावर दिले आहे.