file photo 
गोवा

Drowning Deaths in Goa | राज्यात ११५ दिवसांत ४४ जणांचा बुडून मृत्यू

१० जणांचा मृत्यू समुद्रात; तर इतर वेगवेगळ्या पाणवठ्यांमधील घटना

पुढारी वृत्तसेवा

पणजी : यावर्षी १ जानेवारी ते २५ एप्रिल या ११५ दिवसांत राज्यात तब्बल ४४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यापैकी केवळ १० जणांचा मृत्यू समुद्रात, तर उर्वरित ३४ जणांचा मृत्यू इतर पाणवठ्यांमध्ये झाला आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांचे समुद्रात बुडून मृत्यू होत असल्याने गोव्याचे समुद्रकिनारे धोकादायक असल्याची प्रतिमा काही वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. मात्र, अलीकडची आकडेवारी वेगळेच सांगत आहे. गोव्यात समुद्रापेक्षा नद्या, कालवे, खाड्या, विहिरी, खाणी आणि इतर पाणवठे अधिक जीवघेणे ठरत असल्याचे यंदाच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

यंदा सर्वाधिक मृत्यू नद्यांमध्ये झाले आहेत. आंघोळ करताना किवा मासेमारीदरम्यान १३ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्याखालोखाल समुद्रातील मृत्यूंची संख्या १० आहे. तसेच नद्यांत उड्या मारून आत्महत्या करणारे ५, खाडीत बुडून मृत्यू ४, कालव्यात बुडून मृत्यू ३, विहिरीत बुडून २, बंधाऱ्यात बुडून २, स्वीमिंग पूलमध्ये १ तर बादलीतील पाण्यात बुडून दहा महिन्यांच्या एका बालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या आठवड्यात केपेत दोन युवक बुडाले. इोशियस शॅरी (२४, फातोर्डा) आणि हरजितसिंग धनू (२२, उत्तराखंड) अशी मृतांची नावे आहेत.

हे दोघेही रविवारची सुट्टी मौजमजेत घालवण्यासाठी मडगाव येथून केपे येथे आले होते. दुपारच्या सुमारास कालव्यात उतरल्यावर पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी भाटपाल येथील वजे नदीत ऋत्विक नाईक (वय ११, कारवार) आणि ध्रुव वडार (वय ७, नवेवाडे, भाटपाल) या पोहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यांच्या बुडून मृत्यू झाला.

बुडून मृत्यू झालेल्या ४४ जणांपैकी २८ जण स्थानिक आहेत. त्यातील अकराजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले असताना दुर्घटनेत सापडले. तसेच ६ पर्यटक व ११ बिगर गोमंतकीयांचा बुडून मृत्यू झाला. यात बजे नदीत बुडालेल्या नंदनगदा, कारवार, कर्नाटक येथील ऋत्विक नाईक या ११ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

दरम्यान, मागील ११५ दिवसांत विविध किनाऱ्यांवर ४१ जणांचे प्राण वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. याउलट नद्या, कालवे, खाड्या आणि इतर पाणवठ्यांवर अशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही. धोकादायक स्थळांवर सूचना फलकही नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. सर्व पाणवठ्यांसाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक सुरक्षा धोरण तयार करणे, पंचायत व नगरपालिका स्तरावर प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी तयार करणे, जीव वाचवणारी सामग्री उपलब्ध करणे, बोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणे, शाळा आणि महाविद्यालयांत जलसुरक्षा प्रशिक्षण सुरू करणे आणि पालकांच्या उपस्थितीतच मुलांना पोहायला सोडणे या उपाययोजना हकनाक जाणारे वळी वाचवण्यासाठी करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT