पणजी : राज्यात पिटबुल, रॉटवेलर, केन कोर्से आणि डॉग अर्जेटिनो या चार हिंसक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ९८ टक्के लोकांनी आक्षेप घेतला आहे. एकूण १७० प्रतिसादकापैकी १६५ प्रतिसादकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
राज्य सरकारने या चार श्वान जातींना हिंस्त्र म्हणून अधिसूचित करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी जनतेकडून आक्षेप आणि सूचना मागवल्या होत्या. त्यांना सुमारे १७० आक्षेप आणि सूचना प्राप्त झाल्या. त्यातील केवळ पाच जणांनी या चार श्वान जातींना क्रूर घोषित करावे, असे सुचवले आहे,
तर उर्वरित १६५ लोकांनी या श्वान जातींना क्रूर घोषित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. राज्यात हिंस्र श्वानांच्या हल्ल्यात लहान मुलांचा बळी जाण्याच्या आणि जखमी होण्याच्या घटना वाढल्याने राज्य सरकारने अशा हिंस्र श्वानांवर बंदी घालण्याचा विचार चालवला होता. ज्यांच्याकडे असे श्वान आहेत त्यांनी नोंदणी करून प्रमाणपत्र घ्यावे आणि नवीन श्वान खरेदी किंवा आयात करू नये, असे सुचविले होते. त्यानंतर सरकारने हिंसक प्राणी पाळण्यास बंदी घालणारे विधेयक मंजूर केले होते.
राज्य सरकारने अलीकडेच गोवा प्राणी प्रजनन आणि पाळीवकरण (नियमन आणि भरपाई) विधेयक, २०२५ मंजूर केले आहे, ज्याद्वारे हिंस्र प्राण्यांना पाळीव बनवण्यास आणि त्यांचे प्रजनन करण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच अशा जातींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. हिंस्र प्राण्यांना पाळीव बनवणे आणि त्यांची पैदास करण्यासंदर्भात, कायद्यात असे म्हटले आहे की, अधिसूचना जारी झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती उक्त अधिसूचनेत नमूद केलेल्या जातीच्या किंवा वर्गाच्या कोणत्याही प्राण्याला पाळीव बनवणार नाही, त्याची पैदास करणार नाही किंवा त्याच्याकडून पैदास करवून घेणार नाही.
जो कोणी या कायद्याच्या किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांना पाळीव बनवतो, त्यांची पैदास करतो किंवा पैदास करण्यास कारणीभूत ठरतो, त्याला तीन महिन्यांपर्यंत वाढू शकणाऱ्या परंतु १५ दिवसांपेक्षा कमी नसलेल्या साध्या कारावासाची, ५० हजार रुपयांच्या दंडाची आणि सामुदायिक सेवेची शिक्षा होईल, असे कायद्यात म्हटले आहे.
सरकारने मॅलिनॉइस जातीला वगळले
सुरुवातीला पशुसंवर्धन संचालनालयाने कुत्र्यांच्या पाच जातींना हिंस्त्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु सरकारने मॅलिनॉइस जातीचा समावेश वगळला, कारण सुरक्षा दलांकडून त्यांची भरती केली जाते.