

पणजी : राज्यातील काही शाळांकडून प्रवेश अर्जासोबत दिल्या जाणाऱ्या प्रॉस्पेक्टससाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याची बाब शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना याबाबत कठोर निर्देश जारी करण्यात आले आहेत.
प्रवेश अर्जासोबत प्रॉस्पेक्टस दिला जात असल्यास त्याची किंमत १०० रुपयांपेक्षा अधिक आकारता येणार नाही, तसेच छपाईचा प्रत्यक्ष खर्च १०० रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यानुसारच शुल्क आकारावे, असे निर्देश परिपत्रकाद्वारे नमूद करण्यात आले आहेत.
सोमवारी अभाविपच्या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिक्षण संचालकांना निदेवन दिल्यानंतर त्वरीत ही परिपत्रक जारी करण्यात आले आहे. संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त किंवा छुपे शुल्क आकारण्यास सक्त मनाई राहील.
कोणत्याही कारणाखाली विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केल्यास संबंधित शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शाळांनी प्रॉस्पेक्टसच्या खर्चाची गणना पारदर्शकपणे ठेवावी आणि आवश्यकतेनुसार ती माहिती शिक्षण संचालनालयाच्या तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी. या निर्देशांचे तत्काळ प्रभावाने काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.