BJP Pudhari
गोवा

Goa Politics | जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान

Goa Politics | माजी जि. पं. सदस्यच अपक्ष उमेदवार : उत्तरेत भाजप, तर दक्षिणेत 'आप'चा जोरदार प्रचार

पुढारी वृत्तसेवा

  • भाजपने मोठ्या प्रमाणावर नवे उमेदवार दिल्याने बंडखोरी उफाळली आहे.

  • काही ठिकाणी अपक्ष उमेदवार भाजपच्या मतांचे विभाजन करू शकतात.

  • आप आणि भाजपचा प्रचार जोरात, काँग्रेसचा प्रचार तुलनेने मंद आहे.

  • बंडखोरीमुळे भाजपच्या बहुमतावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यातील ५० पैकी ४० जागा लढवताना तब्बल ३६ नवे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या काही विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली असल्याने भाजपसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान आहे.

भाजपात असलेले माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यासारख्या नेत्यांनीही बंडखोरी करुन आपला अपक्ष उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्हा पंचायतीवर बहुमत मिळवण्याच्या भाजपच्या स्वप्नांना काही जागी झालेली बंडखोरी सुरुंग लावेल, अशी भीती भाजपच्या वरिष्ठांना वाटत आहे.

सध्याचा प्रचाराचा एकूणच मागोवा घेतल्यास उत्तर गोव्यात भाजपचा प्रचार जोरदारपणे सुरू असून उमेदवारांसोबत शेकडो कार्यकर्ते व नेते घरोघरी प्रचारात गुंतले आहेत. आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्यावर भर दिला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री अतिशी मार्लेना या गोव्यामध्ये ठाण मांडून होते. या काळात काँग्रेस कार्यकत्यांना आणि मतदारांना आपकडे वळवण्यासाठी केजरीवाल यांचे प्रयत्न सुरू होते.

काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून दिल्यास ते आमदारांप्रमाणे भाजपात जातील, अशी भीती मतदारांसमोर केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप केजरीवाल यांनी केले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हजें घर योजनेसोबतच राज्य व केंद्र सरकारने केलेली कामे व विविध योजनांची माहिती देऊन लोकांनी विकासासाठी भाजपला मते द्यावीत, असे आवाहन करत आहेत.

काँग्रेस पक्षाचा प्रचार काही ठिकाणी सुरू आहे; मात्र त्यात जोर कमी दिसतो. त्यासोबत कार्यकर्त्यांची उणीवही जाणवते. आरजी पक्षाचा प्रचार ठरावीक ठिकाणी सुरू असून युवा कार्यकर्ते त्यांच्या सोबत दिसतात. भाजपमधील बंडखोरीचा विचार करताना उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष असलेले कार्तिक कुडणेकर यांनी सुकूर जि. पं. मतदारसंघांमध्ये बंडखोरी केली असून ते अपक्ष लढत असल्याने भाजपचे उमेदवार अमित अस्नोडकर यांच्यासमोर आव्हान ठरले आहेत.

बाबू आजगावकर यांनी पेडणेतील तोरसे जि. पं. मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार राघोबा कांबळी यांच्या विरोधात प्रदीप कांबळी या अपक्ष उमेदवाराला उभे केल्याने तेथे भाजपची मते विभागणीचा धोका आहे. कुठ्ठाळीतील भाजपचे कार्यकर्ते अच्युत नाईक हे भाजपचे उमेदवार सुनील गावस यांच्या विरोधात सांकवाळ जि. पं. मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असल्याने गावस यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दक्षिण गोव्यात विशेषतः आदिवासी क्षेत्रात चांगला दबदबा असलेल्या दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष संजना वेळीप यांनीही भाजपशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता दिसते.

प्रचाराचे शेवटचे तीन दिवस

जिल्हा पंचायतीसाठी २० रोजी मतदान होणार आहे. ५० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीचा जाहीर प्रचार १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे उर्वरित तीन दिवसांत जास्तीत जास्त मतदारांकडे पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवार धडपड करतील.

भाजपकडून बंडखोरांची हकालपट्टी

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत बंडखोरी केलेल्या किंवा पक्षविरोधी काम करणाऱ्या १० भाजप सदस्यांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये शिवा चोडणकर (शिवोली), कार्तिक कुडणेकर (सुकूर), भावना नाईक (शिरोडा), संजना वेळीप (गिरदोली), संजय वेळीप (गिरदोली), आतिश गावकर (घारबांदोडा), सुधा गावकर (सावर्डे), विपीन प्रभुगावकर (पैगिन), अच्युत नाईक (सांकवाळ) व राजेश शेट्टी (साखवाळ) यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT