पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुका नेमक्या केव्हा होतील... असा प्रश्न राजकीय पक्षांसह गोवेकरांनाही पडला होता. शेवटी राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी पणजी येथे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर शनिवारपासून आचारसंहिता लागू झाल्याचे जाहीर केले. यावेळी आयोगाचे सचिव वेनान्सीयो फुर्तादो आणि सहायक संचालक सागर गुरव उपस्थित होते.
मिनिनो डिसोझा (आयएएस) यांनी जाहीर केलेल्या जिल्हा पंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नामांकन अर्ज 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळात स्वीकारण्यात येतील. 3 डिसेंबर सार्वजनिक सुट्टी व 7 डिसेंबर रविवार वगळता त्या त्या तालुक्याच्या मामलेदार कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेर्पंयत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. नामांकन अर्जांची छाननी बुधवार, दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होईल. गुरुवार, दि. 11 डिसेंबर हा उमेदवारी मागे घेण्याचा दिवस आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 11 डिसेंबर रोजीच अंतिम उमेदवारांची यादी जारी होईल.
शनिवार, दि. 20 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पत्रिकेद्वारे मतदान होईल. जि. पं. निवडणूक पक्षीय पातळीवर होणार असल्याने मतदान यादीवर पक्षाची चिन्हे असतील, तसेच अपक्ष उमेदवारांची त्यांना दिलेली चिन्हेही असतील, अशी माहिता डिसोझा यांनी दिली. सोमवार, दि.22 रोजी मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त 5 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी आहे, अशी माहिती डिसोझा यांनी दिली.
8,68,637 मतदारांना मतदानाचा हक्क
जिल्हा पंचायतीच्या 50 जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी उत्तर गोव्यात 658 व दक्षिण गोव्यात 625 अशी एकूण 1,284 मतदान केंद्रे असतील. उत्तर गोव्यात 4,39,480 मतदार, तर दक्षिण गोव्यात 4,29,157 मतदार असून, एकूण मतदार संख्या 8,68,637 आहे, अशी माहिती डिसोझा यांनी दिली.