Milk Production Pudhari
गोवा

Goa Dairy Milk Supply Drop | कन्सलटंटवर महिन्याला 24 लाख खर्च; तरी दूध वितरणात घट कशी ?

Goa Dairy Milk Supply Drop | कन्सलटंटवर महिन्याला २४ लाख खर्च करूनही दूध वितरणात ५० हजारांवरून ३५ हजार लिटर्सपर्यंत घट; व्यवस्थापनावर गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

गोवा डेअरीच्या दूध वितरणात वाढ करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कन्सलटंटवर दररोज सुमारे ८० हजार रुपये, म्हणजेच महिन्याला २४ लाख रुपये खर्च केला जात असला तरी दूध उत्पादन आणि वितरणात वाढ होण्याऐवजी ते ५० हजार लिटरवरून ३५ हजार लिटरपर्यंत घसरल्याचा आरोप दूध उत्पादकांनी केला.

एवढा खर्च करूनही अपेक्षित परिणाम न मिळाल्याने ही पैशांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल त्यांनी फोंड्यात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. पत्रकार परिषदेला अनुप देसाई, प्रमोद सिद्धये, वैभव परब आणि लाला सतरकर हे दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गोवा डेअरीची पूर्वीची वितरण व्यवस्था बाजूला सारून नवीन कन्सलटंट नेमल्यामुळे डेअरीचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध खरेदी दरात वाढ केली असून त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मात्र, काही उत्पादक स्वतःच्या फायद्यासाठी न्यायालयात गेल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, गोवा डेअरीतील अनियमिततेबाबत व्यवस्थापन आणि सहकार निबंधकांकडे वारंवार जाब विचारूनही प्रतिसाद न मिळाल्यानेच न्यायालयात जावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खाजगी डेअऱ्यांकडून आकर्षक ऑफर्स मिळूनही गोवा डेअरीशी निष्ठा कायम ठेवली असल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले.

सरकारने नियुक्त संचालक मंडळ किती काळ कायम ठेवणार, असा प्रश्न उपस्थित करत तातडीने निवडणुका घ्याव्यात किंवा रिक्त संचालक पदे भरावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सहा कोटी रुपयांच्या मुदतठेवीवर १२ कोटी रुपयांचा ओव्हरड्राफ्ट घेण्याच्या कथित प्रयत्नालाही त्यांनी विरोध दर्शविला.

मुख्यमंत्र्यांचे आभार

दूध उत्पादकांना दरवाढ देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष संजीव कुंकळेशकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT