मडगाव : पुढारी वृत्तसेवा
तब्बल सोळा अल्पवयीन मुलींना फसवून अश्लील व्हिडीओ काढून ते व्हायरल करणाऱ्या नगरसेवक पुत्र सोहम सुशांत नाईक (२० वर्षे रा. माधेगाळ, काकोडा) याला रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या दै. 'पुढारी'चे कौतुक करताना सोमवारचा कुडचडे बंद मागे घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
या सेक्स स्कँडल प्रकरणातील संशयिताला अटकन केल्याच्या निषेधार्थ कुडचडेच्या ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी रात्री कुडचडे पोलिस स्थानकावर धडक मोर्चा काढला होता. जोपर्यंत संशयित आरोपीला पोलिस अटक करत नाहीत,
तोपर्यंत पोलिस स्थानकावरून हलणार नाही, अशी भूमिका घेत नागरिकांनी कुडचडे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नेल्सन कुलासो यांना घेराव घालण्याच्या प्रकरामुळे कुडचडेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत ते पोलिस स्थानकावर ठाण मांडून होते. संशयिताची ओळख पटल्यानंतरही पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तक्रार देण्यासाठी कोणीही समोर येत नसल्याचे पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट करताच लोक संतापले. पोलिस निरीक्षकांची बदली करा, अशी मागणी करत घोषणाबाजी केली. संशयिताला अटक न केल्यास कुडचडे बंदचा इशारा नागरिकांनी दिला होता. याप्रकरणाचा सखोल व निःपक्षपाती तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष प्रमोद नाईक, नगरसेवक प्रदीप नाईक, विश्वास सावंत देसाई, टोनी फर्नांडिस, माजी नगरसेवक आनंद प्रभुदेसाई, पुष्कल सावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुष्कल सावंत म्हणाले, दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत संबंधिताला तत्काळ अटक होणे आवश्यक होते. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत. गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना पीडित मुलींचे पालक स्वतःहून तक्रार देण्यास येणार नाहीत. त्यासाठी पोलिसांनी एवढ्यात एखाद्या महिला संघटनेची मदत घेऊन तक्रारदारांची भेट घेणे आवश्यक होते, असे सांगितले. या प्रकरणाची नि:पक्षपातपणे चौकशी केली जावी, अशी मागणी माजी नगरसेवक आनंद प्रभू देसाई यांनी केली होती.