मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कुडचडेत जप्त करण्यात आलेला नऊ लाख रुपये किमतीचा गांजा छत्तीसगड येथून आणण्यात आला होता व तो गांजा नेण्यासाठी आलेला इसम हा केपे भागात राहणारा होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे अमली पदार्थ व्यवसायाचे केपे कनेक्शन उघड झाले आहे.
मात्र, आम्हीच गांजाची पुडके करून विकत आहोत या जबाबावर दोन्ही संशयित ठाम राहिल्यामुळे म्होरक्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना अजून शक्य झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. केपेचा तिळामळ भाग अमली पदार्थाचे केंद्र म्हणून ओळखला जातो.
गेल्या आठवड्यात कुडचडे पोलिसांनी सातेरी मंदिरामागील सागच्या मैदान परिसरात कारवाई करत ९.११६ किलो संशयित गांजा जप्त करून दोघांना अटक केली होती. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत अंदाजे ९.११ लाख रुपये आहेत.
कुडचडे पोलिस स्थानकाचे पीएसआय गौतम शेटकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी संग्राम राऊत (मूळ ओडिशा) व उमेश यादव (मूळ गोरखपूर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान संशयितांच्या ताब्यातून एक राखाडी रंगाची बॅग व एक आकाशी निळ्या रंगाची ट्रॉली बॅग जप्त करण्यात आली. या बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये गांजाची १० बंडले आढळून आली. या सर्व पदार्थाचे एकूण वजन ९.११६ किलो असल्याचे निष्पन्न झाले.
हे दोघेही संशयित शेल्डे आणि तिळामल येथे बऱ्याच काळापासून भाड्याने राहत आहेत. शिवाय ते रोजंदारीवर काम करत असल्यामुळे नऊ लाख रुपये किमतीचा गांजा त्यांनी कसा आणला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पोलिस उपनिरीक्षक गौतम शेटकर यांना विचारले असता, सध्या तपास सुरू असून गांजा नेण्यासाठी आलेल्या जोगिंदर नमक व्यक्तीला ही अटक करून चौकशी केली जात असल्याचे ते म्हणाले.