पणजी : २०२५ मधील इस्रायली नागरिक असलेला ड्रग्ज माफिया डेव्हिड द्रिहॅम ऊर्फ डुडू याच्याविरुद्ध अमलीपदार्थ प्रकरणात आरोप करण्याचे आदेश उत्तर गोव्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले. जून २०२५ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्याच्याविरुद्ध ड्रग्जचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार आहे.
म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने डुडूच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी एनसीबीने त्याच्या अटकेमागील लेखी स्वरुपात ठोस कारणे उघड न केल्याबद्दल ताशेरे ओढत त्याला सशर्त जामीन दिला होता. उत्तर गोव्यातील छाप्यात संशयिताला कोकेनप्रकरणी एनसीबीने अटक केली होती.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की अटकेची कारणे ना आरोपीला देण्यात आली, ना त्याच्या नातेवाईकांना दिली गेली. अटक पंचनामा आणि अटकेची कारणे हे वेगवेगळे असतात, असे स्पष्ट करत न्यायालयाने हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारात निर्णय देताना केलेल्या निरीक्षणांचा हवाला देण्यात आला होता.
दरम्यान, तपास पूर्ण करून एनसीबीने डिसेंबर २०२५ मध्ये डुडूविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये न्यायालयाने २०१२ च्या अमली पदार्थ प्रकरणात पुरेशा पुराव्याअभावी डुडूची निर्दोष मुक्तता केली होती. त्यावेळी गोवा पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
गोवा पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांवर २०१२ मध्ये डुडूवर खोटे अमली पदार्थ प्रकरण लावल्याचा आरोप होता. हे प्रकरण नंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयच्या तपासात डुडूला धमकावण्यात आल्याचे आणि त्याच्याविरुद्ध खोटे प्रकरण तयार करण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्याला विशेष न्यायालयाकडून क्लिनचीट मिळाली होती.