पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील भाजप सरकारचे अपयश आता विरोधक नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या मंत्री, आमदार आणि कंत्राटदारांनीच उघड केले आहे. राज्यभरातील हॉटमिक्सिंग व रस्ते दुरुस्तीची कामे रखडल्यामुळे हे सर्वजण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून त्यामुळे सरकारमधील विस्कळीत कारभार समोर आला आहे. त्याला जबाबदार कोण, असा टोला काँग्रेसने भाजप सरकारला लगावला आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या माध्यम व संवाद विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले की, जेव्हा सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारच सार्वजनिकपणे रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करतात, तेव्हा तो मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावरील थेट अविश्वासाचा दाखला ठरतो.
पर्यटन मंत्री तथा पर्वरी मतदारसंघाचे आमदार रोहन खंवटे आणि उपसभापती तथा म्हापसा मतदारसंघाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यांमधून भाजप सरकारमधील समन्वयाचा आणि प्रशासनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेला सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जबाबदार आहेत हे सरकारने स्पष्ट करायला हवे. पावसाळा तोंडावर आला असताना राज्यातील अनेक रस्ते अजूनही उखडलेले, खराब अवस्थेत आणि अपूर्ण आहेत.
हजारो प्रवासी व वाहन चालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना अमरनाथ पणजीकर म्हणाले की, हे सरकार अकार्यक्षम, बेजबाबदार आणि जनतेच्या समस्यांबाबत असंवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रस्ते देण्याऐवजी सरकार कारणे देत आहे आणि उपाययोजना करण्याऐवजी बळीचा बकरा शोधण्याचे काम करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.