पणजी : पुढारी वृत्तसेवा
मतभेद दूर ठेवून व सर्व प्रकारचा त्रास सहन करून काँग्रेस पक्ष भाजप विरोधी पक्षांच्या युतीसाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे. यासाठी पक्षाने समिती स्थापन केली असून चर्चेला सुरुवात झाल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.
विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी प्रथमच काँग्रेसने युतीची बोलणी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे, समितीची पहिली बैठक मडगावात झाल्यानंतर प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ही माहिती दिली.
राज्यात भाजपला हरवण्यासाठी विरोधी पक्षांचे एकत्र येण्याची गरज आहे. विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी जनतेची इच्छा आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन समिती स्थापन केली आहे. इतर कोणत्याही पक्षाने युतीसाठी समिती स्थापन केलेली नाही. जे पक्ष निवडणुकीत भाजपला हरवू पाहत आहेत, त्या सर्वांशी बोलणी करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
काँग्रेस प्रमाणेच इतर विरोधी पक्ष सुद्धा सर्व ४० मतदारसंघांत कार्य करीत आहेत. विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत, तरीही भाजपला हरवण्यासाठी मतभेद बाजूला ठेवले जातील, युतीसाठी काँग्रेसला काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला, तरी तो सहन करण्याची तयारी आहे, असे चोडणकर म्हणाले.
प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने युतीसाठी समिती स्थापन केली आहे. अर्थात गोवा फॉरवर्ड पक्षाने युतीची बोलणी तूर्त थांबवली आहे. गोवा फॉरवर्ड काँग्रेसप्रमाणे सर्व मतदारसंघांत कार्य करीत आहे.
त्यांनी बोलणी थांबवली असली, तरी योग्य वेळ येताच निर्णय घेतला जाईल. टाळी एका हाताने वाजत नसते. युतीसाठी इतर पक्षांकडूनही सकारात्मक प्रतिसाद येण्याची आवश्यकता आहे. भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.
कारण विरोधाकांच्या फुटीचा लाभ भाजपला होणार आहे. त्यामुळे सर्वच विरोधकांनी प्रसंगी एक पाऊल मागे घेण्याची तयारी ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
युतीसाठी सर्व पक्षांबरोबर बोलणी करण्याचा निर्णय बैठकीत घेतला गेला, असे चोडणकर म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख आदी उपस्थित होते.