Goa Congress Internal Dispute 2026  
गोवा

Goa Congress Internal Dispute 2026 | काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह, आरजीतही गोंधळ

Goa Congress Internal Dispute 2026 | विरोधकांत फूट : अमित पाटकर यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; दुहीचा लाभ कोणाला ?

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी रविवारी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी कोणत्या काँग्रेसबरोबर राहणार हे ठरवावे, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या विधानामुळे अमित पाटकर हे एक वेगळी काँग्रेस स्थापन करणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात यापूर्वी रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्ष दोन गटांत विभागला गेला आहे.

पक्षातील वादानंतर अध्यक्षपद सोडलेले मनोज परब यांच्या जागी नवा अध्यक्ष आरजीला अद्याप मिळालेला नाही. निवडणूक वर्षात आरजी पक्षाची ही स्थिती असताना गेली चार वर्षे बरेच कष्ट करून आणि खिशाला खार लावून प्रदेश काँग्रेसचा गाडा हाकणारे अमित पाटकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी दोन वेळा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले गिरीश चोडणकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये दुफळी माजलेली आहे.

चोडणकर यांच्या नियुक्त्तीनंतर प्रदेश सरचिटणीस मनीषा उसगावकर व इतरांनी पदांचे राजीनामे दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना निवडताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, अशी कैफियत दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार व्हिरियातो फर्नाडिस यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे.

अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर गेले अनेक दिवस शांत असलेले अमित पाटकर यांनी विजय सरदेसाई यांना कोणत्या काँग्रेस बरोबर राहायचे हे ठरवावे लागेल, असे विधान केल्याने काँग्रेसची गोव्यामध्ये दोन शकले होणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले आहेत. तसेच गोव्यात काँग्रेसचे होणार की काय, अशी चर्चा पाटकर यांच्या विधानामुळे सुरू झालेली आहे. तसे झाले तर दोन पक्षांतील ही फूट नेमकी कोणाला लाभदायी ठरणार याची चर्चा सध्या सुरू आहे.

वेळ कमी तरी सुस्ती एका बाजूला भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू करून २०२७ मध्ये ३० जागा मिळविण्याचे लक्ष्य ठेवून नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता असतानाही विरोधी पक्ष मात्र सुस्त आहेत. निवडणुकीला सहा महिने बाकी असताना कोणतीही रणनीती ठरवली जात नाही. काँग्रेससह विरोधातील सर्वच पक्ष चतुर्थीनंतरच प्रत्यक्ष निवडणुकीचे काम करणार असे दिसते. मात्र अवघ्या चार महिन्यांत काम करून जिंकता येईल का, हा प्रश्न आहे.

दोन नेत्यांच्या दोन यात्रा

गोवा फॉरवर्ड व काँग्रेसची युतीची बोलणी लवकर व्हावी व मतदारसंघ वाटून घ्यावेत, असे विजय सरदेसाई यांना वाटत आहे. त्यांनी तशा सूचना अनेक वेळा काँग्रेसला केल्या. मात्र, काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व वा केंद्रीय नेतृत्व त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे गोवा फॉरवर्डने राज्यातील दहा मतदारसंघ निवडून तेथे गट अध्यक्ष नेमून पक्षाचे काम सुरू केले आहे.

विजय सरदेसाई यांनी काँग्रेस सोबत युती गृहीत धरू नये, असे म्हटल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे. रविवारी त्यांनी आपल्या वाढदिनी राज्यात अनंत चतुर्दशीनंतर विजय यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी काँग्रेसतर्फे गोवा राखण यात्रा काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT