पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याबाहेरील लोकांनी गोव्यात येऊन शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला असल्यास ते सहन केले जाणार नाही. त्याचा प्रत्येक गोमंतकीयाने निषेध करण्याची गरज आहे. या प्रकरणाचा योग्य तो तपास व पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
पणजीतील आझाद मैदानावर एसआयआर प्रक्रियेविरोधात सीजीपीतर्फे मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी हिंदुद मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. धार्मिक तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी झाला होता. यासंदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना एका कार्यक्रमनांतर विचारले असता ते म्हणाले, अशा प्रकारच्या घोषणा धार्मिक तणाव निर्माण करतात. यात शंभर टक्के तथ्य आहे.
त्या मोर्चाचा संपूर्ण पोस्ट मी पाहिला आहे. त्यावरील तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्याची पडताळणी झाल्यावर कायदेशीर काय कारवाई करता येईल, ती घेण्याचे निर्देश दिले जाईल. अशा प्रकारच्या आंदोलनातून काही लोक व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या आंदोलनावेळी दिलेल्या घोषणांची पत्रकारांनीही दखल घेऊन त्याचा निषेध करायला हवा होता, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
कारवाई करा !
'सीजीपी'च्या पणजी येथील आंदोलनाचा एक व्हिडीओ सामाजिक माध्यमात प्रसारित झालेला आहे. त्यामध्ये 'हिंदुवाद मुर्दाबाद' अशी घोषणा आहे. 'सीजीपी'चे हे आंदोलन 'विशेष सखोल मतदार सूची पुनरीक्षण' आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदाचे त्यागपत्र देणे या मागण्यांवर होते. पण हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी आणि देशातील धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी प्रयत्न होता, असे स्पष्ट होत आहे, असे हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सत्यविजय नाईक यांनी म्हटले आहे.