पणजी : पुढारी वृत्तसेवा
सरकारी नोकर भरतीत पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराला व वशिलेबाजीला कुठेच वाव राहू नये व पात्र उमेदवारानांच नोकरी मिळावी, यासाठी स्थापन केलेल्या कर्मचारी भरती आयोगाद्वारेच सरकारी नोकर भरती होईल. आत्तापर्यंत २५०० च्या आसपास नोकऱ्या याच माध्यमातून दिल्या, पुढेही हजारो नोकऱ्या याच पद्धतीने देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. तत्पूर्वी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री जादूगार आहेत.
ते निवडणुकीपूर्वी २२ हजार नोकऱ्या देतील, असे विधान केले होते. त्यानंतर दुपारी या विधानाबाबत डॉ. सावंत यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी वरील उत्तर दिले. दरम्यान, नोकऱ्या २२ हजारच की किती देणार ते सांगू शकत नाही पण हजारो नोकऱ्या मिळतील. विश्वजित राणे यांनी आपल्या खात्यातील रिक्त जागांची यादी द्यावी, त्याही भरू, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, भरती प्रक्रियेत कोणताही शॉर्टकट अवलंबला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केल्यामुळे राणे यांनी व्यक्त केलेल्या भावनेला जागा नाही, हे यावरून दिसून आले.
डॉ. सावंत म्हणाले, सरकारच्या विविध खात्यांसह विविध महामंडळा-तील रिक्त जागा भरल्या जात आहेत. मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत काही पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच इतर खात्यांमध्येही आवश्यकतेनुसार भरती सुरू आहे. निवडणुकीपूर्वी उर्वरित बहुतांश पदे भरण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे डॉ. सावंत म्हणाले.
नोकर भरती निवडणुकीपूर्वी : विश्वजित
गोव्यातील बेरोजगारांत सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण आहे. त्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्या देणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात २२ हजार रिक्त पदे भरली जातील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मॅजिशियन (जादूगार) आहेत. त्यामुळे ते निश्चितपणे या नोकऱ्या उपलब्ध करतील, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी केले.
शुक्रवारी मिरामार पणजी येथे भारतीय प्रशिक्षित परिचारिका संघटना गोवा राज्य शाखेच्या चौथ्या वार्षिक राज्य परिषद नर्सिंग परिषद ४.० सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राणे यांनी वरील दावा केला. ते म्हणाले की, सत्तरी तालुक्यातील युवक व युवती नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, राज्यभरही तीच स्थिती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार असून, भाजपचे सरकारच त्या उपलब्ध करून देऊ शकते.
येत्या सहा महिन्यांत या नोकऱ्या उपलब्ध केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले दरम्यान, राणे यांनी काही कर्मचाऱ्यांना स्वतः मानधन देणार, असे म्हटले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, सरकारी प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना आपण कामावर घेतले होते; त्यांना सरकारी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपण मानधन देणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.