CM Pramod Sawant 
गोवा

CM Pramod Sawant | केंद्राच्या सहाय्यामुळे गोवा पायाभूत सुविधांमध्ये अव्वल

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : पंतप्रधान नरेंद्र मोदींना अभिनंदनपर पत्र

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4,399 दिवसांचा ऐतिहासिक कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय अर्थसहाय्यातून 30,000 कोटींहून अधिक मूल्याच्या विविध प्रकल्पांमुळे गोव्याने पायाभूत सुविधांमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी प्रगती साधली असून राज्य देशात आघाडीवर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीहून 'एक्स' हँडलवरून प्रसिद्ध केलेल्या संदेशात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्याच्या जनतेच्या वतीने पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. विकासकामांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, नवीन जुवारी पूल, मडगाव पश्चिम बायपास तसेच दोन वंदे भारत रेल्वे सेवा आणि 299 किमीपेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्गामुळे राज्याच्या कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी क्रांती झाली आहे.

या विकासाच्या पार्श्वभूमीवर गोवा आर्थिकदृष्ट्या देशातील मजबूत राज्यांपैकी एक बनले असून नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात राज्याचा पहिल्या तीनमध्ये समावेश झाला आहे. तसेच जीएसटी संकलनात 74 टक्के वाढ आणि महसुली अधिशेष नोंदवला गेला आहे. खाणकाम क्षेत्राच्या पुनरुज्जीवनामुळे गोव्याने राज्य खाणकाम सज्जता निर्देशांकात 'ब' श्रेणीतील राज्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून हजारो कुटुंबांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचे सांगत त्यांनी आयआयटी गोवा, राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ, आयआययूएलईआर आणि धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा उल्लेख केला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर-स्पेशालिटी विभागामुळे दररोज हजारो रुग्णांना सेवा मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राज्यात 100 टक्के नोंदणी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना गोव्यात 4,500 हून अधिक बचत गटांमध्ये 57,000 हून अधिक महिला कार्यरत असून 4,387 'लखपती दीदी' निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. गोवा 100 टक्के 'हर घर जल' साध्य करणारे पहिले राज्य ठरले असून हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेतून मुक्त झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच पीएमजीकेएवाय, भारतनेट आणि पीएम ग्राम सडक योजना यांसारख्या योजनांमध्ये राज्याने 100 टक्के संतृप्तता साधल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोवा पूर्ण साक्षर राज्य असून देशातील दुसऱ्या क्रमांकाचा कमी बालमृत्यू दर आणि दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT