https://www.youtube.com/watch?v=Nq0GkUDy6es 
गोवा

Goa Majha Flat Scheme | 'माझा फ्लॅट' योजना 15 दिवसांत जाहीर

Goa Majha Flat Scheme | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : सहकारातून समृद्धीसाठी संचालकांनी निस्वार्थीपणे काम करावे

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील सुमारे ३० ते ४० हजार फ्लॅटधारकांच्या नावावर मालमत्ता नसल्याची समस्या लक्षात घेऊन राज्य सरकार 'माझा फ्लॅट' योजना येत्या १५ दिवसांत जाहीर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मेरशी येथे प्रोव्हेदोरियाच्या जुन्या वारसा इमारतीच्या नूतनीकरण केलेल्या सहकार सेवा भवनाचे उ‌द्घाटन क्रांतिदिनी त्यांच्या हस्ते झाले.

यावेळी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार रुडाल्फ फर्नांडिस, जिल्हा पंचायत सदस्य गौरी कामत, सरपंच सुशांत गोवेकर, सहकार सचिव महेशकुमार शंभू आणि सहकार निबंधक आशुतोष आपटे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, अनेकांनी बिल्डरकडून किंवा सोसायटीमार्फत फ्लॅट घेतले असले तरी ते त्यांच्या नावावर झालेले नाहीत.

'माझा फ्लॅट' योजनेअंतर्गत फ्लॅटसह जमीनही संबंधितांच्या नावावर करण्यात येणार आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्बाधणीतील अडथळे दूर करण्यासही ही योजना मदत करेल. सहकार क्षेत्राबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सहकारी संस्था या सामाजिक सेवेचे माध्यम असून संचालकांनी निस्वार्थीपणे काम करणे आवश्यक आहे.

गोवा सहकार क्षेत्रात आदर्श राज्य बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असून एनपीए-मुक्त सहकारी संस्था घडविण्यावर भर दिला जात आहे. सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या पुढाकाराचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले, जुनी वारसा इमारत पाडण्याऐवजी तिचे संवर्धन करून सहकार सेवा भवन उभारणे ही महत्त्वाची बाब आहे. राज्यात ५६०० पेक्षा अधिक सहकारी संस्था व १४५० हून अधिक स्वयंसहाय्य गट कार्यरत आहेत.

जुलैअखेर एनपीए-मुक्त सहकार क्षेत्राचे लक्ष्य : मंत्री शिरोडकर

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की, राज्यातील सहकार क्षेत्र जुलैअखेरपर्यंत एनपीए-मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून थकीत कर्ज वसुली मोहीम राबवली जात आहे. सध्या सुमारे ५००० कर्जप्रकरणे प्रलंबित असून त्यांची वसुली सुरू आहे. राज्यात सुमारे दहा लाख शेअर होल्डर असून सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल सुमारे १५ हजार कोटी रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT