मयुरेश वाटवे
गोव्यात सध्या ‘गुपचूप गुपचूप’ काय सुरू आहे ते उच्च न्यायालयात दिसते आहे. नवीन कॅसिनोचे अजस्र धूड मुरगाव बंदरात दाखल झाले आहे. पणजी किनाऱ्यावर कॅसिनोत आणि कॅसिनोबाहेर जे गैरप्रकार सुरू आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. पाहिले न मी तुला, मी तुला न पाहिले अशा पद्धतीचे हे अव्यक्त प्रेम आहे. खाण व्यवसायाशिवाय गोव्याचे पानही हलणार नाही असा समज एके काळी करून देण्यात येत असे. खाण व्यवसाय बंद पडला, थोडा संघर्ष करावा लागला; पण कोणाचे काही अडले नाही. आता तोच समज कॅसिनोंबद्दल करून देण्यात येत आहे. काही दिवसांनी कॅसिनो म्हणजेच पर्यटन आणि पर्यटन म्हणजेच कॅसिनो असे सांगायला सुरुवात केली नाही म्हणजे मिळवली!
जुन्या सचिवालयाजवळच अत्यंत विद्रूप पद्धतीने सर्व खाडी कॅसिनोंनी व्यापली आहे. कॅसिनो सुंदर आहेत, पण त्याने खाडीला ओंगळवाणे स्वरूप आणले आहे. आता एक नवीन मेगा कॅसिनो मांडवी नदीत उतरण्यास सज्ज झालेला आहे. मी मारल्यासारखे कर, तू रडल्यासारखे कर असा एकूण हा प्रकार दिसतो आहे. खरे तर एवढ्यात तो दाखल झालाच असता. पण ‘इनफ इज इनफ’ चळवळीतील मंडळी त्या विरोधात उच्च न्यायालयात गेल्याने तो प्रयत्न फसला. विनापरवाना वाहन आढळले तर वाहतूक पोलिस हात धुवून मागे लागतात आणि एवढे मोठे जहाज कोणतीही परवानगी न घेता, किंवा ‘तत्त्वत:’ का होईना तोंडी मान्यता न घेताच समुद्रात फिरते आहे यावर कोणाचा विश्वास बसेल काय?
गोवा म्हटल्यानंतर जी प्रतिमा गोव्याबाहेरील लोकांच्या मनात निर्माण होत असे त्याच्या अगदी विपरीत चित्र सध्या आहे. शांत समुद्रकिनारे, निवांत गाव, सण-उत्सव आणि सुशेगाद जीवनशैली हे कुठल्या कुठे लुप्त झाले आहे. गेल्या दोन अडीच दशकांत या प्रतिमेत मोठा बदल झाला आहे. पर्यटनाच्या नावाखाली आणि महसुलाच्या हव्यासापोटी गोव्यात ज्या गोष्टींना प्रोत्साहन दिले गेले, त्यामुळे हे झाले आहे. त्यात सर्वात वादग्रस्त ठरले ते म्हणजे कॅसिनो. सुरुवातीला ‘उच्चभ्रू पर्यटन’, ‘रोजगारनिर्मिती’ आणि ‘राज्याचा महसूल’ या नावाखाली कॅसिनोंचे स्वागत करण्यात आले. पण आज परिस्थिती अशी आहे की, कॅसिनो हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही; ते गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिकतेला आव्हान देणारे संकट बनले आहे.
फार पूर्वी बस लॉबी सरकार चालवायची, नंतर त्यांची जागा खाण लॉबीने घेतली आणि आता कॅसिनो लॉबीने. गोव्यात कॅसिनोंना सुरुवातीपासूनच लोकांचा विरोध होता. कारण गोव्याची संस्कृती ही जुगार, रात्रीचे उन्मादी जीवन आणि पैशाच्या आहारी गेलेल्या संस्कृतीशी कधीच सुसंगत नव्हती. स्थानिकांना भीती होती की, कॅसिनो हे बाहेरून पैसा आणतील; पण त्याचबरोबर गुन्हेगारी, व्यसने, सामाजिक असुरक्षितता आणि सांस्कृतिक ऱ्हासही आणतील. दुर्दैवाने आज ती भीती खरी ठरताना दिसते आहे.
कॅसिनोंचे समर्थक नेहमी महसुलाचे तुणतुणे वाजवतात. पणजी महापालिका निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांनी कॅसिनोचा मुद्दा घेतला तेव्हा महापौर रोहित मोन्सेरातनी आपलाही कॅसिनोंना विरोध असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या उपजीविकेचे काय, रोजगाराचे काय असा प्रश्न उपस्थित केला होता. खाण बंदी आल्यानंतर हाच प्रश्न उपस्थित करण्यात येत नव्हता का? राज्य सरकारला कॅसिनोंमधून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. पण एखाद्या राज्याचा ‘विकास’ फक्त महसुलावर मोजता येत नाही. त्या महसुलाच्या बदल्यात समाजातील नैतिकता ढासळत असेल, गुन्हेगारी वाढत असेल, तर असा विकास विनाशकारी ठरतो. गोव्यातील परिस्थिती याचेच उदाहरण आहे. कॅसिनोंनी राज्याला काही आर्थिक फायदा दिला असेल; पण त्याची सामाजिक किंमत प्रचंड आहे.
आज गोव्यातील वाढती गुन्हेगारी हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. विशेषतः गेल्या काही वर्षांत चोरी, अमली पदार्थ व्यवहार, फसवणूक, लैंगिक गुन्हे, भांडणे, आर्थिक गुन्हे आणि संघटित गुन्हेगारीत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. कॅसिनोंचे आगमन आणि गुन्हेगारीच्या विकासाचा आलेख समांतर आहे. अलीकडेच नॅशनल क्राईम रिकॉर्ड्स ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. देशभरात गुन्हेगारीचे प्रमाण जवळपास ६ टक्क्यांनी घटले असताना गोव्यात मात्र वाढ नोंदवली गेली आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. गोव्यात ही उलटी गंगा का वाहू लागली त्याचे कारण उघड आहे. फक्त त्याकडे महसूलप्रेम बाजूला ठेवून पाहण्याची सरकारची तयारी हवी.
रात्री उशिरापर्यंत चालणारे व्यवहार, मोठ्या प्रमाणावर होणारी पैशांची उलाढाल, बाहेरून येणारे संशयास्पद घटक आणि जुगाराशी संबंधित मानसिक ताण यामुळे गुन्हेगारी वाढण्यास पोषक परिस्थिती निर्माण होते. कॅसिनो हे केवळ जुगाराचे केंद्र नसून त्याभोवती एक संपूर्ण काळी अर्थव्यवस्था उभी राहते, हे जगभरातील अनुभवातून सिद्ध झाले आहे.
गोव्यातील सामाजिक वातावरणात झालेला बदलही तितकाच धोकादायक आहे. पूर्वी गोव्याची ओळख निवांत, सुरक्षित आणि कुटुंबवत्सल राज्य अशी होती. पण आता अनेक स्थानिकांना स्वतःच्या शहरातच असुरक्षित वाटू लागले आहे. कॅसिनोच्या नावाखाली येणाऱ्या पर्यटकाला सोयीसुविधा देण्याच्या खटाटोपात स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा विचार फारसा केला जात नाही.
गोवा हे केवळ पार्टी डेस्टिनेशन नाही; तो एक समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला प्रदेश आहे. येथे लोककला, संगीत, सण-उत्सव, पारंपरिक जीवनशैली आणि सामाजिक सलोखा यांना मोठे महत्त्व आहे. पण पर्यटनाच्या व्यावसायिकीकरणामुळे आणि कॅसिनो संस्कृतीमुळे ही ओळख मागे पडत चालली आहे. गोव्याकडे आता अनेक जण ‘जुगार आणि मौजमजेचे केंद्र’ म्हणून पाहू लागले आहेत. आपल्याला ही ओळख निर्माण करायची आहे का?
सरकारची याबाबतची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. सुरुवातीला कॅसिनो तात्पुरते असल्याचे सांगण्यात आले. नंतर ते खोल समुद्रात हलवले जातील, असे आश्वासन देण्यात आले. पण प्रत्यक्षात दर सहा महिन्यांनी मुदतवाढ देत त्यांना त्याच ठिकाणी राहण्याची परवानगी देण्यात आली. आता तर सरकारमधील काही घटक उघडपणे कॅसिनो पर्यटनासाठी आवश्यक असल्याचे सांगू लागले आहेत. म्हणजेच लोकांच्या भावना, पर्यावरणीय प्रश्न आणि सामाजिक परिणाम याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
सध्या मांडवी नदीत आणण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या प्रचंड मोठ्या कॅसिनो जहाजाच्या वादाने हेच स्पष्ट केले आहे. न्यायालयाने यापूर्वी हे जहाज मांडवीत आणण्यास मनाई केली असतानाही ते मुरगाव बंदरात दाखल झाले. सरकार म्हणते की ते केवळ नांगरणीसाठी परवानगी दिलेले जहाज आहे, तर कंपनी स्पष्टपणे सांगते की ते कॅसिनोसाठीच आणले आहे. म्हणजेच सरकार आणि कंपनी परस्परविरोधी भूमिका घेत आहेत. ‘नवीन जहाज येणार नाही’ असे सरकार सांगते; पण प्रत्यक्षात ७० लोकांची क्षमता असलेले जहाज हटवून २००० लोकांची क्षमता असलेले जहाज आणले जात आहे. याला ‘बदली’ म्हणता येणार नाही. याचिकादारांचाही हाच मुद्दा आहे.
या सर्व प्रक्रियेत लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. ‘इनफ इज इनफ’ सारख्या संघटनांनी या विरोधात आवाज उठवला नसता, तर कदाचित हे जहाज गुपचूप मांडवीत दाखलही झाले असते.
गोव्याच्या सामाजिक आरोग्यासाठी हा इशारा गंभीर आहे. महसुलासाठी आणि पर्यटनासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी सरकार दाखवत असेल, तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. आज गोव्यात वाढणारी गुन्हेगारी, बदलती सामाजिक मूल्ये, वाढती असुरक्षितता आणि पर्यावरणीय हानी हे सारे एकमेकांशी जोडलेले आहेत. कॅसिनो हा त्याचा केंद्रबिंदू बनत चालला आहे.
गोव्यातील जनता आपल्या भूमीवर, संस्कृतीवर आणि पर्यावरणावर प्रेम करते. गोव्यातील आंदोलनांतून तोच संदेश द्यायचा प्रयत्न जनता करत आहे. आमदारांना पराभूत करण्याएवढा हा आवाज अजून मोठा बनला नसेल, पण म्हणून तो दुर्लक्षिण्यासारखाही नाही. जनतेच्या भावना ऐकण्याची जबाबदारी सरकारवर आहे. सरकारने उघड्या डोळ्यांनी, सजगपणे एकदा आपल्या निर्णयाकडे पाहिले पाहिजे.