Suspicious Death Pudhari
गोवा

Sandeep Salayam Udupi Goa | संदीपचा मृत्यू चुकून झोपेच्या गोळ्या घातलेल्या मद्यप्राशनामुळे !

Sandeep Salayam Udupi Goa | संशयित रुपाश्रीचा दावा; आरोपातून सुटण्यासाठी रचलेला बनाव असल्याचा पोलिसांना संशय

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये उडुपी, कर्नाटक येथील वॉटर स्पोर्टस व्यावसायिक संदीप सलायम यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. याप्रकरणी बंगळूरमधून अटक करण्यात आलेली संशयित महिला अक्षता एम.के. ऊर्फ रूपाश्री हिने चौकशीदरम्यान काही धक्कादायक माहिती दिली आहे.

संदीप यांचा मृत्यू घातपाताने नव्हे, तर चुकून झोपेच्या गोळ्या असलेले मद्यप्राशन केल्यामुळे झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. परंतु पोलिस तिच्या या विधानावर विश्वास ठेवण्यास तयार नसून, हा केवळ हत्येच्या आरोपातून सुटण्यासाठी रचलेला बनाव असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलेला व्हिसेराचा फॉरेन्सिक अहवाल हाती आल्यानंतरच संदीप यांचा मृत्यू अतिप्रमाणात गुंगीचे औषध घेतल्याने झाला की त्यामागे इतर काही कारण होते, हे स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. फॉरेन्सिक अहवाल या खून प्रकरणात महत्त्वाचा दुवा व पुरावा ठरेल. अक्षताचा हा 'अपघाताचा' दावा पोलिसांनी तूर्तास फेटाळून लावला आहे.

समोर आलेले पुरावे आणि तिची पार्श्वभूमी तिच्या दाव्याशी जुळत नाही. अक्षता ही एमबीए पदवीधर असून ती साडी नेसवणारी एक्स्पर्ट म्हणून काम करते आणि महिन्याला सुमारे ५० हजार रुपये कमावते. मात्र, पोलिसांच्या मते, श्रीमंत पुरुषांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवणे, त्यांच्याशी मैत्री करणे आणि नंतर त्यांच्या ड्रिकमध्ये गुंगीचे औषध देऊन त्यांना लुटणे, ही तिची जुनीच गुन्हेगारी पद्धत आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, जानेवारी २०२६ मध्ये पणजी येथेही अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये एका व्यक्तीला गुंगीचे औषध देऊन त्याचे पैसे, दागिने आणि पाकीट लुटण्यात आले होते; यामागेही अक्षताचाच हात असल्याचा संशय आहे. या अटकेनंतर इतरही काही तिच्या जाळ्यात अडकलेले पुरुष समोर आले असून, त्यांनीही अक्षताने अशाच प्रकारे जाळ्यात ओढल्याचे कबूल केले आहे.

रुपाश्रीच्या मते त्या दिवशी नेमके काय झाले ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षताने चौकशीदरम्यान कबुली दिली की, तिने स्वतःसाठी झोपेच्या गोळ्या आणलेल्या आणि त्या ड्रिंकमध्ये मिसळल्या होत्या. मात्र, गप्पा मारण्याच्या ओघात चुकून तो ग्लास संदीप यांच्या हातात गेला. ते ड्रिंक प्यायल्यानंतर ते बेशुद्ध झाले. हे पाहून ती घाबरली आणि घाबरून स्थितीत संदीप यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून पळ काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT