पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याच्या विकासासाठी भाजपचे सरकार गेली १३ वर्षे सातत्याने काम करत आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे गोव्याच्या विकासाला चालना मिळालेली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा सर्व घटकाना तथा सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पर्वरी विधानसभा कक्षात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सावंत बोलत होते. यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही कांडावेलू व अर्थ सह सचिव प्रणव भट उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, ३० हजार १९५ कोटींचा अर्थसंकल्प आपण सादर केला.
ज्यात, सरप्लस बजेट १,६६६ कोटींचे आहे. माझे घर योजना, सरकार तुमच्या दारी या योजना पंचायत पातळीवर राबवल्या जातील शिबिरे घेऊन लोकांच्या समस्या सोडवल्या जातील. १० वर्षे कंत्राटी पद्धतीने सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे.
गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांमध्ये २० टक्के जागा ठेवली जाईल, लोकांच्या मागणीनुसार अयोध्येत श्रीराम निवास उभारण्यासाठी २५ कोटी खर्च करून जागा घेण्यात आली आहे, पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्माई निवास त्याचबरोबर वेलांकनी येथे गोवा निवास बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन कॅसिनोसाठी २०० टक्के जागा शुल्क
पाण्यातील नव्या कॅसिनोला आपले सरकार परवानगी देणार नाही. मात्र, जमिनीवरच्या नव्या कॅसिनोसाठी जे सध्या परवाना शुल्क आहे; त्यात २०० टक्के वाढ झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.