पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी राज्याचा २०२६-२७सालासाठीचा ३०,१९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यावर्षी २९,१८१ कोटी रुपयांचा महसूल येण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यात व्यक्त केली आहे. निवडणूक वर्ष असल्यामुळे कुठलीही कर न वाढ न करता सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वसमवेशक असा अर्थसंकल्प डॉ. सावंत यांनी सादर केला.
मुख्यमंत्र्यांनी तब्बल २ तास ३५ मिनिटांच्या कालावधी हा अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री म्हणाले, गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे यावर्षी २,५०० अतिरिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करुन भरती सुरू केली असून ११०० जागा भरल्या. यावर्षी आणखी २५०० जागासाठी जाहिराती दिल्या जातील, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोव्याचा दरडोई जीएसडीपी अंदाजे ८.१८ लाख आहे, तर २०२६-२७ मध्ये एकूण जीएसडीपी १.३१ लाख कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. राज्य सरकार प्रस्तावित तिसऱ्या जिल्ह्यासाठी "व्हिजन कुशावती" हा विकास आराखडा तयार करेल, अशी घोषणा डॉ. सावंत यांनी केली.
राज्य सरकार अनाथांसाठी सरकारी नोकरीत आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समर्पित कोटा प्रदान करेल, विद्यार्थी वाहतूक सेवा मजबूत करण्यासाठी, शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या प्रवास सुविधा देण्यासाठी बालरथ बस टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील. राज्यातील उच्च माध्यमिकमध्ये शिकणाऱ्या मुलीसाठी बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
यावर्षी दोनापावला येथे एकात्मिक महाविद्यालय संकुलाचे बांधकाम सुरू करेल, कॅम्पसमध्ये फार्मसी, गृहविज्ञान, ललित कला, संगीत, वास्तुकला आणि बी.एड महाविद्यालये यासह सहा संस्था सामावून घेतील. दक्षिण गोव्यातील काकोडा येथे तरुणांना प्रमाणित ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी ड्रोन पायलट इन्स्टिट्यूट स्थापन केले जाईल. कार्यक्रम निर्मिती, तांत्रिक ऑपरेशन्स, स्टेजिंग, प्रकाशयोजना, ध्वनी अभियांत्रिकी आणि लग्नाच्या आतिथ्य यांचा समावेश असलेला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाईल.
राज्याच्या रस्ते नेटवर्कला सतत पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी ३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मडगाव रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचे काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाला १,८९७ कोटी रुपये वाटप केले आहेत, यात पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी १,३०० कोटी रुपये समाविष्ट आहेत. प्रत्येक मतदारसंघात १०० कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले. जातील, पेयजल विभागाच्या वाटपात २५ टक्के वाढ केली आहे, २०२६-२७या आर्थिक वर्षासाठी १,००९ कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत. २०० एमएलडी पेक्षा जास्त क्षमतेचे पाणी सुविधा प्रकल्प पूर्ण केले जातील. यात पाणी संवर्धन आणि कार्यक्षम वापरावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सरकार तुमच्या दारी उपक्रम सर्व पंचायतींतर्फे राबवणार असून राज्यातील जुन्या पाण्याच्या पाईपलाईन टप्प्याटप्प्याने बदलून पाणीपुरवठा व्यवस्थेत सुसूत्रता आणली जाईल. डिचोली, काणकोणे व कुंकळ्ळी येथे मोठ्या जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले, वीज खात्यासाठी ५,१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सौरऊर्जा अभियानांतर्गत वेद योजना सुरू करण्याची आणि ग्रामीण भागात हरित स्वयंपाक उपायांना चालना देण्याची घोषणा त्यांनी केली. पर्यटनासाठी ३८५ कोटी रुपयांची तरतूद करत २०२५ मध्ये गोव्यात १.०८ कोटी पर्यटक आले होते. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
वास्को शहराला हरित शहर, स्वच्छ शहर करण्यासाठी केंद्राकडून १८० कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचे सांगून कल्याण, व्यापार आणि क्रीडा यावर लक्ष केंद्रीत करणारा मोप शहर प्रकल्प केंद्रीय निधीतून राबविला जाईल.
दोन्ही उपक्रम यावर्षी सुरू होणार आहेत. आम्वाद सिकेरी येथे आधुनिक हॉस्पिटॅलिटी स्किलिंग सेंटर स्थापन करण्यासाठी एका कंपनीशी करार करण्यात येईल. मडगाव, मुरगाव, पणजी, वास्को, नावेली, कळंगुट, कुडचडे, फातोर्डा आणि म्हापसा शहरांतील राज्यभरातील सांडपाणी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी गोवा सांडपाणी महामंडळाला १९१.५ कोटी रुपये देण्यात आले आहे.