पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील 'बर्च' नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी प्रमाणपत्रे देताना योग्य प्रकारे पाहणी केली नसल्याने हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैज्ञानिक सहायक चैतन्य साळगावकर आणि कनिष्ठ पर्यावरण अभियंता विजय हरिचंद्र कानसेकर यांना निलंबित केले आहे.
योग्य तपासणी न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष लेविन्सन मार्टिन्स यांनी दिली. बर्च बाय रोमिओ लेन या नाईटक्लबमध्ये आवश्यक तपासणी आणि नियमांचे पालन न झाल्याचे दंडाधिकारी चौकशी अहवालात उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणाचा अहवाल शासनाला सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध खात्यांच्या प्रमुखांची तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी नाईट क्लबला परवानग्या देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले.
अन्न व औषध प्रशासन, पंचायत संचालनालय, अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय आदी विभागांतील संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या दंडाधिकारी चौकशी अहवालात भविष्यात अशा आग लागण्याच्या घटना टाळण्यासाठी ६० शिफारसी सुचवण्यात आल्या असून, त्यानुसार आवश्यक उपाययोजना राबवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
या प्रकरणामुळे गोव्यातील नाईटक्लब आणि पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. चौकशी अहवालातील शिफारशी सुमारे ५०० हून अधिक दस्तावेजाचा समावेश असलेला दंडाधिकारी चौकशी अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे त्यामध्ये सुमारे ६० शिफारशी करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये बर्च बाय रोमिओ लेनचे मूळ बांधकाम हे सुनील दिवकर व प्रदीप घाडी आमोणकर यांनी १९९८-९९ साली केले होते तर तेच दोषी आहेत. याव्यतिरिक्त हडफडे सरपंच व माजी सचिवांवर कारवाई करावी.
जमीन रुपांतरणाची महसूल सचिवांमार्फत चौकशी केली जावी. पोलिस, अबकारी, अग्निशमन दल, अन्न व औषध प्रशासन, पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांना कारणेदाखवा नोटिसा बजावण्यात याव्यात अशा शिफारशी आहेत.