पणजी : पुढारी वृत्तसेवा
डिचोली तालुक्यातील बोर्डे येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत वडिलांनी आपल्या १४ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शव चिकित्सा अहवालानंतर संपूर्ण घटना स्पष्ट झाली असून याप्रकरणी डिचोली पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पिता-पुत्रात खटके उडत होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४९ वाजता म्हापसेकर यांची मुलगी घरी परतली असता, ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, घराच्या आत दोन मृतदेह आढळून आले.
जमिनीवर ५८ वर्षीय संजय शशिकांत म्हापशेकर यांचा मृतदेह पडलेला होता, तर १४ वर्षीय संचित संजय म्हापशेकर या मुलाचा मृतदेह पलंगावर आढळून आला. दोघेही मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी (कुडाळ) येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी बीएनएसएसच्या कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
घटनास्थळी मृत वडिलांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. या चिठ्ठीत मुलाच्या अभ्यास, अभ्यासक्रम आणि वर्तनाबाबत वडील-मुलामध्ये वारंवार वाद होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. मुलाच्या आक्रमक वर्तनामुळे कुटुंबाच्या भविष्यास धोका निर्माण होईल, अशी भीती वाटत असल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही त्यात लिहिले होते.
म्हापसेकर यांची २३ वर्षांची मुलगी ही पर्वरी येथे कामाला होती. ती शनिवारी (१४ मार्च) कामावरून घरी ना येता मावशीकडे गेली होती. त्याची माहिती तिने वडिलांना दिली होती.
वडिलांचा पूर्वनियोजित प्लान...
शनिवारी रात्री मुलगा संचित घरी आला, तो रविवारनंतर बाहेर दिसलाच नव्हता, असे लोकांनी सांगितले. वडील संजय यांनी रविवारी मुलीला फोन करून सोमवारी संध्याकाळी घरी येण्यास सांगितले होते. त्यांनी खोलीच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून मागील दाराने आत गेले व आतून कडी लावली होती. कुलुपाची चावी त्यांनी मुख्य दरवाजाबाहेर असलेल्या शू रॅकमध्ये अडकवून ठेवली होती व त्याची माहिती मुलीला दिली होती. त्यामुळे वडिलांनी हा पूर्वनियोजित प्लान केला असल्याचा संशय पोलिसांना आहे.