Rohan Khaunte Statement
पणजी : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून गोव्याला क्रीडा पर्यटनाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक स्तरावरील सहनशक्ती स्पर्धा, आंतरराष्ट्रीय रग्बी सामने, व्यावसायिक व्हॉलीबॉल लीग आणि मॅरेथॉन यांसारख्या स्पर्धांच्या माध्यमातून गोवा क्रीडा पर्यटनाची सक्षम परिसंस्था उभारत आहे. यामुळे देश-विदेशातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.
एका कार्यक्रमात बोलताना खंवटे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश गोव्याच्या वार्षिक क्रीडा दिनदर्शिकेत केला जात आहे. त्यामुळे भारतासह परदेशातील खेळाडू, प्रेक्षक आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित समुदायांसाठी गोव्यात नव्या संधी निर्माण होत आहेत. क्रीडा स्पर्धांमुळे पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळत असून, राज्याच्या पर्यटनाची व्याप्तीही वाढत आहे.
प्राईम व्हॉलीबॉल लीगचा पाचवा हंगाम ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या व्यावसायिक लीगमध्ये गोव्याच्या ‘गोवा गार्डियन्स’सह एकूण दहा फ्रँचायझी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमुळे भारतातील आघाडीचे व्हॉलीबॉलपटू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एकाच व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर देशभरातील क्रीडाप्रेमींना गोव्याशी जोडण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, वास्को येथे १३ डिसेंबर रोजी एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनची सोळावी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतासह परदेशातील ७५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होतील, अशी माहितीही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.