पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी विरोधकांनी घातलेल्या प्रचंड गदारोळात सुरुवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणात व्यत्यय आणत हडफडे जळीत कांडावर राज्यपालांनी निवेदन करावे, अशी मागणी करून सभापर्तीसमोरील हौद्यात गेलेल्या विरोधकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू विधानसभेत पोचल्यानंतर सभापती डॉ. गणेश गावकर यांनी कामाकाजाला सुरुवात करत राज्यपालांना अभिभाषण करण्याची सूचना केली. राज्यपाल अभिभाषणासाठी उभे राहिले असता, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उठून उभे राहत राज्यपालांनी अभिभाषण नंतर वाचावे, अगोदर हडफडे येथे झालेल्या अग्निकांडात जे २५ जण मृत्युमुखी पडले त्यावर निवेदन करावे, अशी मागणी केली.
मात्र, त्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आक्षेप घेत प्रोटोकॉल अनुसार कामकाज व्हायला हवे, असे सांगितले. राज्यपालांनी आपले अभिभाषण वाचण्यास सुरुवात केल्यानंतर युरी आलेमाव यांच्यासह आमदार विजय सरदेसाई, वीरेश बोरकर, अॅड. कार्ल्स फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, वेन्झी विएगस, क्रुझ सिल्वा काळे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत सभापर्तीच्या आसनासमोर पोचले.
एका बाजूला राज्यपालांचे अभिभाषण सुरू होते. त्यावर सत्ताधारी आमदार बाके वाजवत होते, तर दुसरीकडे विरोधक घोषणा देत होते. शेवटी सभापतींनी मार्शलकरवी विरोधी आमदारांना बाहेर काढले. आणि राज्यपालांचे अभिभाषण पुढे चालू राहिले.
विधानसभेत श्रद्धांजली
राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात हडफडे नाईट क्लब जळीतकांड आणि शिरगाव येथील लईराई जत्रेत मृत झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला. राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर विधानसभेमध्ये हडफडे जळीतकांडासह शिरगाव जत्रेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती डॉ. गणेश गावकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला आणि त्यानंतर सभागृहात उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.