Goa assembly speaker election
पणजी : गोवा विधानसभेचे नवीन सभापती म्हणून सावर्डे मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. गणेश गावकर यांची आज (दि.२५) निवड झाली. विरोधी पक्षातर्फे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे खुल्या पद्धतीने मतदान घेण्यात आले.
कामकाज सुरू करताना सभापती पदाच्या खुर्चीवर उपस्थित राहिलेले उपसभापती जोशूआ डिसोझा यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली. त्यात गणेश गावकर यांना 32 मते मिळाली तर विरोधी उमेदवार डिकोस्टा यांना 7 मते मिळाली. भाजपच्या ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या अनुपस्थित होत्या. त्यामुळे सत्ताधारी पक्षांचे एक मत कमी झाले.
मावळते सभापती रमेश तवडकर यांची गोवा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदावर डॉ. गणेश गावकर यांची निवड झाली आहे. सावर्डे मतदारसंघातून ते दोन वेळा भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत.
त्यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांना सभापतीच्या आसनापर्यंत नेले. त्यानंतर पुढील कामकाज सुरू झाले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी गावकर यांचे अभिनंदन केले. त्यावेळी विविध समित्यांची फेररचना करण्यात आल्याची माहिती डॉ. गावकर यांनी दिली.