Goa Vidhan Sabha  Pudhari
गोवा

Goa Assembly Session | आचारसंहिता असताना विधानसभा सत्र चालू शकते का? विधानसभेत चर्चेवेळी गदारोळ

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Opposition Ruckus Goa Vidhan Sabha

पणजी : गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. फोंडा मतदारसंघ दक्षिण गोव्यात येत असल्याने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे सत्र घेता येते का, याबाबत सोमवारी (दि.१६) सभागृहात चर्चा रंगली.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच आमदार विजय सरदेसाई यांनी आचारसंहिता लागू असताना सरकारला विधानसभेत घोषणा करता येतात का, असा प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर मंत्री दिगंबर कामत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधानसभेला आदेश देण्याचा अधिकार नसून विधानसभा सर्वोच्च संस्था असल्याचा मुद्दा मांडला. मात्र दक्षिण गोव्यासंदर्भात कोणत्याही घोषणा करू नयेत, असे त्यांनी नमूद केले. त्यावर सरदेसाई यांनी आक्षेप घेतला. कामत यांनी पुढे सांगितले की, ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प संमत करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सॉलिसिटर जनरलचा सल्ला घ्यावा. विधानसभा सर्वोच्च असून ती याबाबत निर्णय घेऊ शकते, असेही ते म्हणाले.

सभापती डॉ. गणेश गावकर यांनीही आर्थिक तरतुदी करण्याचा अधिकार विधानसभेला असल्याचे सांगितले. मात्र दक्षिण गोवा वगळून सरकार आर्थिक घोषणा कशा करणार, कारण त्या संपूर्ण गोव्यासाठी लागू होतात, असा मुद्दा विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आचारसंहिता दक्षिण गोवा जिल्हा आणि फोंडा मतदारसंघापुरती लागू असल्याचे स्पष्ट केले. दक्षिण गोव्यासाठी कोणतीही घोषणा सरकार करणार नाही. या विषयावर कायदेशीर सल्ला घेतला जात असून दुपारी सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच मुख्य सचिव केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, सोमवारी कामकाज सुरू होताच काळे कपडे घालून आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी खासगी विधेयके चर्चेला घ्यावीत, अशी जुनी मागणी पुन्हा केली. त्याचवेळी आचारसंहितेच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा सुरू झाल्याने काही काळ गोंधळ शांत झाला. मात्र चर्चा संपताच विरोधकांनी पुन्हा फलक हातात घेऊन सभापतींसमोर घोषणाबाजी सुरू केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खासगी विधेयकांचा दिवस शुक्रवार असतो, आज सोमवार असल्याचे सांगून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने सभापती डॉ. गणेश गावकर यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT