पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर केला; मात्र तो सादर करण्यापूर्वी मिराबाग येथील नागरिकांनी विधानसभेत येऊन घोषणा दिल्यामुळे बराच वाद निर्माण झालेला आहे.
राज्यात विविध प्रकल्पांना होणारा विरोध आणि अन्य प्रश्नांवरून विरोधक अधिक आक्रमक होणार असल्याने सरकारची आजपासून खऱ्या अर्थान कसोटी लागणार आहे.
पहिल्याच दिवशी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून मिराबाग ग्रामस्थांनी घोषणाबाजी केल्याने सुरक्षेच्या कारणातून सभापती डॉ. गणेश गावकर यांनी विधानसभेमध्ये प्रवेश देताना कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
गॅलरीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी करून नागरिकांना प्रवेश दिला जाऊ शकतो. घोषणाबाजी देणारे जामिनावर सुटल्यानंतर गोवा फॉरवर्डतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.
त्यामुळे या नागरिकांना फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांची फूस होती, हेही स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर दि. २७ मार्च पर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात आक्रमक विरोधकांसमोर सत्ताधाऱ्यांचा कस लागणार आहे.
सरकारकडून सडेतोड उत्तर शक्य...
विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार असल्यामुळे विरोधक जास्त आक्रमक होऊन लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न करणार आहेत. याची पूर्वकल्पना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना असल्यामुळे तेही आक्रमकपणे विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोडपणे उत्तर देण्याची शक्यता आहे.